शिवसेनेची सत्ता, राष्ट्रवादीकडून पाठिंब्याचे पत्र फॅक्सने राजभवनला

राज्यात आता शिवसेनेची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Updated: Nov 11, 2019, 06:43 PM IST
शिवसेनेची सत्ता, राष्ट्रवादीकडून पाठिंब्याचे पत्र फॅक्सने राजभवनला title=

मुंबई : राज्यात आता शिवसेनेची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १५ दिवस सत्तासंघर्षाच्या जो तिढा होता, तो सुटल्यात जमा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार येणार आहे. राष्ट्रवादीकडून पाठिंब्याचे पत्र फॅक्सने राजभवनला पाठविले आहे. कारण काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा दिला आहे. दरम्यान, राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर सस्ता स्थापनेच्या हालचालींना मोठा वेग आला होता. आता शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. राजभवनावर शिवसेनेचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आणि विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे पोहोचले आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आहे, तर आज दिवसभरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठका झाल्यात. तर संध्याकाळी सात वाजता भाजपची बैठक होत आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्विकारावे, अशी आग्रही मागणी होत आहे. शिवसेनेचे, ५६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. तीन पक्ष एकत्रितपणे महाराष्ट्रात पुढचे सरकार स्थापन करण्याची तयारी करत आहेत.

शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे मुंबईतील राज्यपालांच्या इमारतीत पोहोचले. एकनाथ शिंदे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर सरकार स्थापनेसाठी दावा सादर करू शकतात. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना विधानसभेचे नेते म्हणून निवडले आहे. त्यामुळे त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार का, याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.