मुंबई: स्वातंत्र्यदिनापासून मुंबईकरांच्या कुतूहलाचा विषय झालेल्या पेंग्विनच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला आहे. 22 ऑगस्टलाच या पिल्लाचा मृत्यू झाला होता. मात्र, शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत याची माहिती कोणालाही देण्यात आली नाही. शवविच्छेदन अहवालानुसार यकृत खराब झाल्यामुळे या नवजात पिल्लाचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
हम्बोल्ट पेंग्विनच्या जोडप्याने या पिल्लाला जन्म दिला होता. भारतात प्रथमच पेंग्विनचा जन्म झाल्यामुळे अनेकांना या नव्या पाहुण्याबद्दल उत्सुकता होती.
दोन वर्षांपूर्वी २६ जुलै २०१६रोजी राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते. त्यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. सात पैकी सहा पेंग्विनच्या जोडय़ा जुळल्या. त्यापैकी मिस्टर मोल्ट (नर)-फ्लिपर (मादी) या जोडीने ५ जुलैला अंडे दिले होते. अंडे दिल्यानंतर राणीच्या बागेतील डॉक्टर पेंग्विनवर लक्ष ठेवून होते. या पेंग्विनच्या पिलाचा जन्म सुखरूप होण्यासाठी डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात होती. अखेर या पिल्लाचा सुखरूप जन्म झाला होता.