मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी १५ दिवस खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा पंधरवडा १३५ कोटी नागरिकांची परीक्षा पाहू शकतो. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाच्या फेज २ मध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMR या संस्थेने केला आहे.
कुठलीही जागतिक साथ चार टप्प्यांत पसरते. पहिल्या टप्प्यात व्हायरसची लागण परदेशातून आलेल्या व्यक्तींकडून होते. जसं इटलीतून भारतात आलेल्या एका व्यक्तीपासून प्रथम भारतातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती.
दुसऱ्या टप्प्यात या व्हायरसची लागण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होते. यात अशा नागरीकांचा समावेश असतो जे संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेले असतात.
तिसऱ्या टप्प्यात ही लागण एका समुहापासून दुसऱ्या, समुहापर्यंत पसरते आणि त्या समुहाच्या संपर्कात आलेल्या हजारो नागरिकांना संक्रमित करते.
चौथा आणि शेवटचा टप्पा म्हणजे देशातील एका भागातून हा व्हायरस वेगाने दुसऱ्या भागात पसरु लागतो आणि मग त्याला आवर घालणं अशक्य होतं. सध्या इटली आणि स्पेन हे देश चौथ्या टप्प्यात पोहोचलेत.
त्यामुळे पुढील १५ दिवसांत भारतात कोरोनाचा प्रसार कसा होतोय यासाठी, भारतासाठी खूपच महत्त्वाचे आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
चीन, इराण, इटली आणि रोमसह युरोपातील देश कोरोना व्हायरसच्या पहिल्या टप्प्यातून काही दिवसांत तिसऱ्या टप्प्यात पोहोचले. त्याठिकाणचे नागरिक कोरोनाबाबत जागृत होईपर्यत आणि तिथल्या सरकारी यंत्रणेकडे कोरोनाशी लढण्यासाठी पुरेशी साधनसामग्री उपलब्ध होईपर्यंत खूप उशीर झाला होता.. त्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्यानं झाला आणि सगळं काही ठप्प झालं.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही भारताकडे थोडा वेळ आहे. पण ही वेळ खूप झपाट्याने निघून चाललीये. आणखी थोडा उशीर झाला तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.