मुंबई : शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद काही शमण्याच नाव घेत नाही. एकमेकांमधील कोल्ड वॉर सुरूच आहे. नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
मुंबई क्रीडा, ललित कला प्रतिष्ठानमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या पत्रामध्ये केलं आहे. सामान्यांच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा घाट घालत असल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी महापौरांवर केला आहे. नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. ललित कला प्रतिष्ठानच्या अधिपत्याखाली मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा तरण तलाव आणि अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाचा कारभार आहे. प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर यात पारदर्शकता राहावी म्हणून यावर महापालीकेचे नियंत्रण असावे असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वाटले होते. म्हणून त्यांनी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष महापौर आणि उपाध्यक्ष महापालिका आयुक्त असतील अशी तजवीज करून ठेवली. यात सदस्य म्हणून कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर घेतले. यामागे बाळासाहेबाचा हेतू स्पष्ट व स्वच्छ होता. परंतु, आता मात्र तसे राहिले नाही, असं राणे यांनी सांगितलं.
सामान्य मुंबईकरांसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतून स्थापन झालेलं बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केलाय. नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिलंय. या पत्रातून त्यांनी थेट महापौरांवर आरोप केले आहेत.