मुंबई : मुंबईत सोमवारी मोठ्या थाटामाटात एसी लोकलचं उद्घाटन झालं... मात्र त्यावरून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत आता पुन्हा एकदा मानापमान नाट्य रंगलंय.
या संपूर्ण उद्घाटन सोहळ्यावर भाजपचं वर्चस्व होतं. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत एसी लोकलला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मात्र शिवसेनेला या कार्यक्रमापासून जाणीवपूर्वक लांब ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू झालीय.
मुंबईचे प्रथम नागरिक महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देखील कार्यक्रमाचं छापील निमंत्रण पाठवण्यात आलं नव्हतं. रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं दूरध्वनी करून कार्यक्रमाला येण्यास सांगितलं, असा दावा महापौर महाडेश्वर यांनी केलाय.
कार्यक्रमाला सन्मानानं बोलवण्याचा शिष्टाचार पाळला गेला नाही, अशी टीका महापौरांनी केलीय. त्यामुळं महापौरांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलं. शिवसेनेचे आमदार किंवा खासदारही या उद्घाटन सोहळ्यात दिसले नाहीत.