'...तर लॉकडाऊनची गरज नाही', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्रात पुढचे २ आठवडे महत्त्वाचे

Updated: Mar 16, 2020, 06:54 PM IST
'...तर लॉकडाऊनची गरज नाही', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन title=

मुंबई : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्रात पुढचे २ आठवडे महत्त्वाचे आहेत, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सध्या तरी राज्यात लॉकडाऊनची गरज नाही. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली तर लॉकडाऊनची गरज भासणार नाही, असं सांगतानाच कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.

शाळा, कॉलेज, अम्यूसमेंट पार्क आणि मॉल बंद केले असले, तरी हॉटेल अजूनही सुरूच आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. तसंच धार्मिक ठिकाणी गर्दी करु नये आणि धार्मिक कार्यक्रमही टाळावे, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी सर्व धर्माच्या धर्मगुरूंना केली आहे.

मुंबईमध्ये चौपाट्यांवर अजूनही निर्बंध आणले नाहीत. मात्र लोकांनीच सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. रेल्वे स्थानकं आणि सार्वजनिक ठिकाणी थूंकू नये. स्वच्छता पाळावी. लग्न आणि सार्वजनिक समारंभ टाळावे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. शासन व्यवस्था सज्ज आहे. नागरिकांनी सहकार्य करावं, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. रेल्वे आणि बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला नाही. प्रत्येक गोष्टीसाठी कायदा करु शकत नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.