राज्यातले उद्योग कुणी परराज्यात घेऊन जाऊ शकत नाही - मुख्यमंत्री ठाकरे

 राज्यातले उद्योग कुणी परराज्यात घेऊन जाऊ शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.  

Updated: Dec 1, 2020, 09:24 PM IST
राज्यातले उद्योग कुणी परराज्यात घेऊन जाऊ शकत नाही - मुख्यमंत्री ठाकरे
संग्रहित छाया

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातले उद्योग कुणी परराज्यात घेऊन जाऊ शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. दरम्यान, उत्तर योगी आदित्यनाथ यांनी मिशन बॉलिवूड (Bollywood Industries) हाती घेतल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसने योगींवर थेट आरोप करत करत भाजपला टार्गेट केले आहे.

उद्योजकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातले उद्योग कुणी परराज्यात घेऊन जाऊ शकत नाही, असे वक्तव्य केले आहे. योगी आदित्यनाथ सध्या मुंबईत आहेत. उद्योजक, बॉलिवूड कलाकारांसोबत योगी चर्चा करणार आहेत. राज्यातील उद्योग राज्यातच राहतील.  इथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही. स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. पण कुणी ओढून ताणून येथून काही घेऊन जाणार असेल तर शक्य होणार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबईची ओळख असलेला सिनेउद्योग म्हणजेच बॉलिवूड यूपीत नेण्याच्या उद्देशानं योगींचा हा दौरा असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी योगीच्या दौऱ्यावर टीका केली आहे. भाजपच्या पाच वर्षांच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. आता महाराष्ट्रातले सरकार बदलले तर उत्तर प्रदेशच्या नावाखाली बॉलिवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते. पण भाजपच्या काळात जे झालं ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही, असं अशोक चव्हाण यांनी ठणकावले आहे. 

तर मुंबई आणि बॉलिवूड हे नाते अतूट असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनीही मुंबईतील बॉलिवूड दुसरीकडे जाणे शक्यच नाही, असे म्हटले आहे. तर दुसरीकडं भाजपने योगींच्या दौऱ्याचं स्वागत केले. मुंबईच्या पार्श्वभूमीवर यूपीत सिनेउद्योग उभारला जात असेल तर त्याला आक्षेप कशाला, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.