close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा

पंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींचं वक्तव्य

Updated: Mar 13, 2019, 07:14 PM IST
पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई : पंतप्रधान होण्याची ना माझी, ना संघाची इच्छा' असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी हे वक्तव्य केलं आहे. आगामी निवडणुकीत भाजपला संपूर्ण बहुमत न मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींचं नाव पुढे येऊ शकतं. मात्र त्याआधी गडकरींनी हे वक्तव्य केलं आहे. अथक काम करणं हेच आपलं उद्दीष्ट असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान भाजपला बहुमत मिळालं नाही तर पंतप्रधानपदासाठी मोदींऐवजी दुसरं नाव पुढे येऊ शकतं असं भाकीत शरद पवारांनी कालच केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर गडकरींचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे.

याआधी देखील अनेक नेत्यांनी गडकरी हे पुढचे पंतप्रधान होतील असं वक्तव्य केलं आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं की, 'भाजप नेते नितीन गडकरी आरएसएसचे पुढील पंतप्रधान असतील.'

अमरावतीमध्ये पार पडलेल्या एका ज्योतिष परिषदेत देखील ज्योतिषी डॉ. भूपेश गाडगे यांनी ग्रह-पत्रिकेच्या आधारे नितीन गडकरी हे २०१९ मध्ये पंतप्रधान बनतील असं भाकीत वर्तविलं आहे.

मोदींना विरोध करणारे पण काँग्रेस सोबत नसलेले पक्ष नितीन गडकरींना पाठिंबा देऊ शकतात. जर भाजपला सत्ता स्थापनेसाठी जागा कमी पडल्या तर इतर पक्ष भाजपसमोर काय प्रस्ताव ठेवतात हे देखील पाहावं लागणार आहे.

नितीन गडकरी य़ांनी आपल्या कामाच्या द्वारे देशभरात नाव कमावलं आहे. अनेक प्रकल्प नितीन गडकरी यांनी हाती घेऊन पूर्णत्वास नेले आहेत. देशभरात महामार्गाचं काम जोरात सुरु आहे. त्यामुळे त्यांना अनेकांची पसंती आहे.