३७१ बेडची क्षमता असणाऱ्या कोविड आरोग्य केंद्रांचं लोकार्पण

विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना... 

Updated: Aug 3, 2020, 05:42 PM IST
३७१ बेडची क्षमता असणाऱ्या कोविड आरोग्य केंद्रांचं लोकार्पण title=
संग्रहित छायाचित्र

ठाणे : विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. भविष्यात साथींच्या आजारावर मात करण्यासाठी राज्यभरात समर्पित कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालयं उभारण्याची नितांत गरज असून त्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेय. 

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर पूर्व  येथे कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी उभारलेल्या दोन स्वतंत्र अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे ई लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 

यावेळी, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. क्वारंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रेसिंग ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात.सर्व यंत्रणांनी  मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यासाठीचा इशारा त्यांनी दिला. 

शिवाय, कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान अतिशय काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं म्हणत योग्य औषधोपचाराबरोबरच रुग्णाची योग्य कळजी आणि रुग्णसेवा अत्यंत महत्त्वाचीअसुन यामध्ये हयगय अथवा  दुर्लक्ष होता कामा नये. या पूर्ण प्रक्रियेमध्ये निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

सदैव  दक्ष राहण्यासोबतच रुग्ण शोधणं आणि त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणं यासाठी प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वय असणं गरजेचं  असल्याचंही ते म्हणाले. 

असं आहे अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्र

भाईंदर पूर्व  येथील स्व. प्रमोद महाजन सभागृह, गोपाळ पाटील रोड येथे अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्राची (Dedicated Covid Health Center) उभारणी करण्यात आली आहे. 

७ हजार ९८० चौरस फूट जागेमध्ये उभारलेल्या या आरोग्य केंद्रात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी एकूण २०६ बेड आहेत. हे सर्व बेड ऑक्सिजन सुविधा असलेले आहेत. या केंद्रात नोंदणी, बाह्यरुग्ण व अतिदक्षता विभाग तयार करण्यात आले असून अतिदक्षता विभागात दोन व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सहा किलोलिटर साठवण क्षमता असणारी ऑक्सीजन टाकी बसवण्यात आली आहे.

    
भाईंदर पूर्व (जि. ठाणे) येथील स्व. मीनाताई ठाकरे मंडई येथे उभारण्यात आलेल्या दुसऱ्या समर्पित कोविड आरोग्य केंद्रात (DCHC) कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी एकूण १६५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय तज्ञ व कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. 

विविध चाचण्यांसाठी पॅथॉलॉजी लॅबही उभारण्यात आली आहे. केंद्रात रुग्णांसाठी अन्नपाण्याची सुविधा असणार आहे. तसेच रुग्णांसाठी स्वतंत्र शौचालय व स्नानगृह उपलब्ध करून देण्यात आलं आहेत. तसेच पावसाळ्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आलं आहे.