मुंबई : देशातील भाजपा सरकारविरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठी सर्व विरोधक २६ जानेवारीला मुंबईत 'संविधान बचाव रॅली'द्वारे एकत्र येत आहेत.
दुसरीकडे विरोधकांनी 'संविधान बचाव रॅली'ची घोषणा केल्यानंतर सत्ताधारी भाजपाने त्याला तोंड देण्यासाठी 'तिरंगा रॅली' काढण्याचे जाहीर केले आहे. या तिरंगा रॅलीवर विरोधकांनी टीका केली आहे.
भाजपाची पितृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीच तिरंगा आपला ध्वज मानला नाही आणि आता भाजपा तिरंगा रॅली काढत आहे, हा काळाने उगवलेला सूड असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
'भाजपाची पितृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाचा राष्ट्रध्वज तीन रंगाचा असणे हे अशुभ आहे, असं सांगत राष्ट्रध्वज म्हणून तिरंग्याचा अवमान केला. संघ मुख्यालयात अनेक वर्ष तिरंगा फडकावलाही नाही... तेच लोक तिरंगा रॅली काढतायेत हे हास्यापद आहे' असं विरोधकांनी म्हटलंय.
दुसरीकडे, संविधान बचाव रॅलीमध्ये आपसातील मतभेद विसरून सगळे विरोधक सरकारविरोधात एकत्र येणार आहेत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा समावेश आहे.
ही रॅली यशस्वी व्हावी म्हणून शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी प्रयत्न करत असून याप्रकरणी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. तर यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती.