पापलेट खायला आवडतं? मग ही चिंताजनक बातमी तुमच्यासाठीच...

पापलेट खाणारे स्वतःला खाण्यातील दर्दी समजतात. अशाच पापलेट खाणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी...

Updated: Jul 19, 2019, 05:18 PM IST
पापलेट खायला आवडतं? मग ही चिंताजनक बातमी तुमच्यासाठीच...  title=

सुस्मिता भदाणे, झी २४ तास मुंबई : मासळी खाणाऱ्यांमध्ये पापलेट आवडणाऱ्यांचा मोठा वर्ग आहे. पापलेट आवडणाऱ्यांसाठी थोडी चिंता करायला लावणारी बातमी... येत्या काही वर्षांत समुद्रातले पापलेट संपण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून पापलेट मासे समुद्रात सापडणं कमी झालंय. पापलेटचा हा दुष्काळ पाहता येत्या काळात पापलेट संपतील की काय अशी स्थिती आहे.

पापलेट खाणाऱ्यांना बोंबिल आणि मांदेल्यांना हातही लावावासा वाटत नाही. पापलेट खाणारे स्वतःला खाण्यातील दर्दी समजतात. अशाच पापलेट खाणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी... येत्या काळात तुम्ही बाजारात खरेदी केलेला किंवा तुमच्या ताटात फ्राय होऊन आलेला पापलेट हा शेवटचा पापलेट असण्याची शक्यता आहे. कारण समुद्रातूनच पापलेट मासळी गायब झालीय. 

पालघरच्या सातपाटी भागातील मच्छीमारांच्या दाव्यानुसार गेल्या पाच वर्षात पापलेटची मासेमारी निम्म्यावर आलीय. हे प्रमाण असंच राहिल्यास येत्या पाच ते दहा वर्षांत तुम्हाला औषधालाही पापलेट सापडणार नाही.

मस्यदुष्काळाची अनेक कारण सांगितली जातात. बेसुमार मासेमारी, प्रजननाच्या काळातली मासेमारी, वाढतं प्रदूषण, समुद्रातली बदललेली जैवविविधता ही मस्यदुष्काळाची कारणं सांगितली जातात. त्यामुळे कोणत्याही हंगामात जा तुम्हाला अव्वाच्या सव्वा दराने मासळी खरेदी करावी लागते. मासळीचं प्रमाण असंच घटलं तर पापलेट तुम्हाला फक्त चित्रात पाहायला मिळेल यात शंका नाही.