‘आमच्यासोबत आमची फॅमिली आहे’, तिकिटाचे पैसे मागितल्याने टीसीचा गळा धरला, AC लोकलमध्ये तुफान राडा

मुंबईत लोकलमध्ये टीसी आणि प्रवासी यांच्यात वाद होणे तशी काही नवीन बाब नाही. मात्र या वादात अनेकदा प्रवासी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रकार सध्या घडला आहे.

शिवराज यादव | Updated: Aug 17, 2024, 01:28 PM IST
‘आमच्यासोबत आमची फॅमिली आहे’, तिकिटाचे पैसे मागितल्याने टीसीचा गळा धरला, AC लोकलमध्ये तुफान राडा   title=

मुंबईत लोकलमधून प्रवास करताना अनेकदा टीसी आणि प्रवासी यांच्यात वाद होत असतात. अनेकदा हे वाद टोकाला पोहोचतात. तिकीट नसतानाही काही प्रवासी विनाकारण वाद घालत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात, तर काही वेळा टीसी चुकीची भाषा वापरत असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत असतात, असाच काहीसा प्रकार आज पुन्हा एकदा मुंबई लोकलमधे घडला आहे. यावेळी प्रवाशांनी चक्क टीसीचा गळाच पकडला होता. या सर्व भांडणामुळे ट्रेनही काही काळ रखडली होती.

नेमके झाले काय?

मुंबईतील चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या एसी लोकल ट्रेनमधील टीसी आणि प्रवाशात तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार तिकीटाचे पैसे मागितल्यानं प्रवाशानं चक्क टीसीला मारहाण केलीय. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल  होत आहे.

टीसी जसबीर सिंग तिकीट तपासत असताना त्यांना एसी लोकल ट्रेनमध्ये 3 प्रवासी फर्स्ट क्लासचे तिकीट घेऊन प्रवास करत असल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी दंड भरण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात राडा झाला. अनिकेत भोसले या प्रवासाने टीसीला मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडीओत ऐकू येत आहे की तो आपण कुटुंबासह प्रवास करत असल्याचे सांगत आहे. तसंच आपण ओळखपत्र मागितले असता दाखवले नाही असा दावा करत आहे.

अंधेरी स्टेशन आले असता प्रवाशाला खाली उतरवून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अनिकेत भोसले सरकारी कर्मचारी आहे. गुन्हा नोंदवला तर आपल्या नोकरीवर परिणाम होईल अशी भीती त्याला होती. यामुळे त्याने विनंती केली असता टीसीने गुन्हा नोंद केला नाही. त्यानंतर अनिकेत भोसलेने माफी मागितल्याने वाद मिटला. मात्र, या हाणामारीत टीसी जखमी झाला आहे. मारहाण सुरू असताना गहाळ झालेले टीसीचे १५०० रुपयेही प्रवाशाने भरले.