मुंबई : BJP Morcha in Mumbai : राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आझाद मैदानातून धडक मोर्चा काढला. (BJP Morcha) या मोर्चाच्यावेळी सरकारविरोधात आणि मलिकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसांच्या गाडीत कोंबून नेण्यात आले. (Police arrested Devendra Fadnavis during BJP Morcha)
मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या गुन्हेगारांबरोबर व्यवहार करणाऱ्या मलिकांचा सरकार बचाव का करतंय, असा सवाल भाजप नेत्यांनी केला. मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपने काढलेल्या धडक मोर्चामध्ये मुंबई, ठाण्यातले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. राज्य सरकारने मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचा धडक मोर्चा आझाद मैदान ते मेट्रो थिएटर असा काढण्यात आला. मोठ्या संख्येनं भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आझाद मैदानात जमले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. देवेंद्र फडणवीस आझाद मैदानात पोहोचल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार नितेश राणे यांना ताब्यात घेतले.