राज्यात ५ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी २७ रोजी मतदान

महाराष्ट्र राज्यातील पाच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. २७ जानेवारी २०१९ रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

Updated: Dec 27, 2018, 06:17 PM IST
राज्यात ५ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी २७ रोजी मतदान title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यातील पाच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. २७ जानेवारी २०१९ रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी हे मतदान होणार आहे. तसेच यावेळी पोटनिवडणुकाही होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी  दिली.

कर्जत (रायगड), मलकापूर (सातारा), श्रीगोंदा (अहमदनगर), आरमोरी (गडचिरोली) या नगरपरिषदा आणि महादुला (नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक तर विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील ११ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी ही निवडणूक होत आहे.

निवडणूक वेळापत्रक

या निवडणुकीसाठी २ ते ९ जानेवारी २०१९ या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. नामनिर्देनपत्रांची १० जानेवारी रोजी अर्जाची छाननी होईल. मतदान २७ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान होईल. मतमोजणी २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.

पोटनिवडणूक होणाऱ्या नगरपरिषद - नगरपंचायत

राजापूर ( रत्नागिरी ) - ६अ, आळंदी (पुणे)- ९अ, फलटण (सातारा)- १२अ, दुधनी (सोलापूर)- २ब, पन्हाळा (कोल्हापूर)- ८क, दिंडोरी (नाशिक)- १५, यावल (जळगाव)- १अ, बीड- ११अ, बुलढाणा- १२ब, अर्जुनी (गोंदिया)- १४, गोरेगाव (गोंदिया)- १४.