अरुण मेहेत्रे, पुणे : मुंबईत आज मध्यरात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं. अजूनही अनेक भागात पाण्याचा निचरा झालेला नाही. हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे सकाळी रेल्वे वाहतूकही बंद पडली होती. मुंबईची तुंबई झाल्याचं पुन्हा एकदा चित्र मुंबईकरांनी अनुभवलं. त्यातच विरोधीपक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी यावरुन शिवसेनेवर टीका केली आहे.
मुंबईची यांनी तुंबई केली आहे. शिवसेनेनं करून दाखवलं. वरवर काम करतात त्यामुळे मूळ मुद्द्याकडे लक्ष देत नाही. पावसाळा गेल्यानंतर 7 ते 8 महिने राहतात काम करण्यासाठी तरी देखील काही काम करत नाही. 30 ते 40 वर्ष सत्ता उपभोगून काय केलं? असा सवाल आणि टीका त्यांनी मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर केली आहे.
मुंबईत २९ महत्वाच्या रस्त्यांवर पाणी साचल्यानं बेस्ट वाहतुकीचे तब्बल ९६ मार्ग दुसरीकडून वळण्यात आलेत आहेत. मुंबईत आतापर्यंत 150-200 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे भागात पाणी साचलं आहे.
बेस्टच्या ३० बसेस मुंबईतल्या विविध रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात अडकून बंद पडल्या आहेत. यापैकी २३ बसेस दुरूस्त करून बाहेर काढल्या जात आहेत. तर ७ बसेसपर्यंत मॅकेनिक पाणी साचल्यानं पोहचू शकत नाहीत.