Rahul Gandhi Criticize Ashok Chavan : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क येथील जाहीर सभेद्वारे करण्यात आला. या सभेद्वारे काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी राहुल गांधींनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही वंदन केले. यादरम्यान केलेल्या भाषणादरम्यान राहुल गांधींनी महाराष्ट्रातील काँग्रेसचा बडा नेत्याबद्दल गौप्यस्फोट केला.
राहुल गांधी यांनी भर सभेत एक प्रसंगाचा उल्लेख केला. यात त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसचा बडा नेत्याबद्दल भाष्य केले. काँग्रेस पक्षाचे एक वरिष्ठ नेते आहेत, मी त्यांचं नाव घेणार नाही. ते याच राज्यातील आहेत. त्यांनी माझ्या आईला (सोनिया गांधी) फोन केला होता. त्यावेळी ते रडत सांगत होते, सोनियाजी मला लाज वाटते. माझ्यात यांच्याशी लढण्याची ताकद नाही, मला जेलमध्ये जायचं नाही, असा किस्सा राहुल गांधींनी यावेळी सांगितला. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर हा बडा नेता म्हणजे अशोक चव्हाण असल्याचे बोललं जात आहे.
यापुढे राहुल गांधी म्हणाले, असे ते एकटे नेते नाही, अशा हजारो लोकांना घाबरवण्यात आले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांसारख्या अनेक पक्षांचे नेते असेच निघून गेले. अजिबात नाही. मी ज्या शक्तीचा वारंवार उल्लेख करतोय, त्या शक्तीने त्यांचा गळा पकडून त्यांना भाजपमध्ये समाविष्ट करुन घेतले आहे. ते सर्वजण घाबरुन गेले आहेत. यापूर्वी मी अनेकदा सत्तेत होतो. त्यामुळे मला ही सर्व व्यवस्था माहिती आहे. त्यामुळेच मोदी मला घाबरतात. पण माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही.
गेल्यावर्षी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आम्ही भारत जोडो यात्रा केली. खरंतर ही यात्रा करावी लागली. 2004, 2010, 2014 मध्ये मला जर कोणी विचारले असते की 4000 किलोमीटर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत यात्रा करावी लागेल, तर मी याचा विचार कधीही केला नसता. ही यात्रा आम्हाला का करावी लागली कारण देशाचे जे संवादाचे माध्यम आहे मग ते सोशल मीडिया, मीडिया असू दे जे आज देशाच्या हातात नाही. बेरोजगारी, हिंसा, तिरस्कार, शेतकऱ्यांच्या समस्या, तरुणांच्या समस्या यांसारख्या जनतेच्या समस्या तुम्हाला मीडियामध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे आम्हाला ही यात्रा करावी लागली. कारण आमच्याकडे दुसरा कोणताही उपाय नव्हता, असेही राहुल गांधींनी यावेळी म्हटले.
देशाचे लक्ष आमच्याकडे वळवण्यासाठी संपूर्ण विरोधी पक्षाला 4000 किमीची यात्रा करावी लागली. काही वेळापूर्वी कोणीतरी म्हटले की राजाचा जीव ईव्हीएममध्ये अडकला आहे, ही गोष्ट अगदी खरी आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांसारख्या प्रत्येक भारतातील संस्थेत त्यांचा जीव आहे, असा घणाघातही राहुल गांधींनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.