सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी सध्याचे तरुण-तरुणी अनेकदा सार्वजनिक ठिकाणीही स्टंट किंवा डान्स करत असतात. रस्त्यावर, बाजारात, ट्रेनमध्ये कुठेही ही तरुणाई नाचत सुटते. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्यांनाही यामुळे काही वेळा लाज वाटू लागते आणि अस्वस्थ होतात. पण यातील काहीजण मात्र त्यांना सोबत देतात. अशीच सोबत देणं एका होमगार्डला मात्र महागात पडलं आहे. जीआरपीने त्याच्यावर कारवाई केली आहे.
सोशल मीडियावर एक होमगार्ड कर्मचारी तरुणीसह लोकल ट्रेनमध्ये नाचत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 6 डिसेंबरला ही घटना घडली होती. मध्य रेल्वेच्या सेकंड क्लास डब्यात रात्रीच्या वेळी तरुणी डान्स करत रील शूट करत होती. जीआरपीने या व्हिडीओची दखल घेतली असून, या होमगार्डविरोधात योग्य कारवाई केली असल्याची माहिती दिली आहे.
सायबा या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओत ती वर्दीत असणाऱ्या होमगार्डसह नाचताना दिसत आहे.
एस एफ गुप्ता अशी या होमगार्डची ओळख पटली आहे. व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, सायबा ट्रेनमध्ये नाचत असते. यावेळी तिचा धक्का गुप्ता यांना लागतो. ते तिला दरवाजापासून लांब उभं राहण्यास सांगतात. पण काही वेळाने तेच तिच्यासह नाचताना दिसतात. यावेळी ट्रेनमधील इतर महिलाही मोबाईलमध्ये हे सगळं रेकॉर्ड करत असतात.
दरम्यान होमगार्डने तरुणीसह वर्दीत असा अश्लील डान्स केल्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पण या सर्व नेटकऱ्यांनी त्यावर नाराजी जाहीर केली.
विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या अधिकृत हँडलमध्ये होमगार्डवर त्वरित कारवाई करण्यासाठी आरपीएफला टॅग करण्यात आलं होतं.
दिनांक ६/१२/२०२३ रोजी लोकल ट्रेन पेट्रोलिंग दरम्यान एक होमगार्ड गणवेशात नृत्य करत असल्याची व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन व सत्यता पडताळून, संबंधित होमगार्ड यांच्यावर योग्यती कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये याकरिता दक्षता घेत आहोत.— GRP Mumbai (@grpmumbai) December 12, 2023
जीआरपीने एक्सवर माहिती देत सांगितलं की, "6 डिसेंबरला लोकल ट्रेन पेट्रोलिंगदरम्यान एक होमगार्ड गणवेशात नृत्य करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन व सत्यता पडताळून, संबंधित होमगार्डवर योग्य ती कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी दक्षता घेत आहोत".
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी (GRP) एक्सवर प्रतिक्रिया दिली. जीआरपीने कर्मचाऱ्यांना गणवेशात आणि कर्तव्यावर असताना अशा गोष्टींमध्ये न पडण्याचा सल्ला दिला आहे.