मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पहिले राज्यव्यापी अधिवेशन आज मुंबईतल्या गोरेगावमध्ये होत आहे. यानिमित्त गोरेगावमध्ये मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून राज्यभरातून मनसैनिक या मेळाव्यासाठी येणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवसभर याठिकाणी उपस्थित राहणार असून संध्याकाळी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.एकीकडे पक्षाचा झेंडा आता भगवामय झाला असून मनसे कडवट हिंदुत्वाकडे वळणार अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'मंत्रालयातील अळूचं फदफदं आवडतं की मिरचीचा ठेचा'
गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे गुरूवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मनसेच्या महाअधिवेशनाला सुरूवात होणार आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होईल. यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतील. तसेच मनसेच्या नवीन झेंड्याचेही यावेळी अनावरण होईल. प्रमुख वक्ते आणि नेते यांची भाषणे, विविध विषयांवर पक्षाची काय भूमिका असली पाहिजे, त्याबाबतचे ठराव मांडले जातील. प्रत्येक ठराव मांडण्याची जबाबदारी एका नेत्यावर देण्यात आली आहे. त्या सूचक- अनुमोदन दिले जाईल. दुपारच्या जेवणानंतर काही वक्ते आणि नेते यांची भाषणे होतील. तिसऱ्या सत्रात राज ठाकरे यांचे भाषण होणार असून त्यात पक्षाची नवी दिशा, पक्षबांधणी, पक्षाचा नवीन झेंडा याबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करतील.
शिवसेनेने राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेला हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन नव्याने वाटचाल करण्यासाठी राजकीय स्पेस उपलब्ध झाली आहे. अशावेळी मनसेला भाजपची साथ मिळू शकते. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त बैठक झाली होती. त्यामुळे आजच्या भाषणात राज ठाकरे यावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.