काँग्रेसकडून राज ठाकरेंचे कौतुक; बाळासाहेब थोरात म्हणाले...

लोकसभा निवडणुकीवेळी राज यांनी मोदी-शहा या जोडगोळीविरोधात झंझावाती प्रचार केला होता.

Updated: Jan 27, 2020, 02:39 PM IST
काँग्रेसकडून राज ठाकरेंचे कौतुक; बाळासाहेब थोरात म्हणाले... title=

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपमधील वाढत्या जवळिकीच्या चर्चांमुळे महाविकासआघाडीच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेसकडून राज ठाकरे यांना चुचकारण्याचा प्रयत्न होताना दिसला. काँग्रेस नेते बाळासाहेब ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात जे काम केलं ते उल्लेखनीय होते. आजही ते त्यांच्या भूमिकेवरील ठाम राहतील. राज ठाकरे आपल्या विचारांशी तडजोड करतील, असे वाटत नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

लोकसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा एकही उमेदवार रिंगणात उतरवला होता. मात्र, त्यांनी राज्यभरात सभा घेत मोदी-शहा या जोडगोळीविरोधात झंझावाती प्रचार केला होता. उत्तम वक्तृत्व आणि भाजपविरोधी मुद्द्यांच्या प्रभावी मांडणीमुळे राष्ट्रीय स्तरावर राज ठाकरे यांची भाषणे चर्चेचा विषय ठरली होती. विधानसभा निवडणुकीच्या काळातही राज यांच्या सभा लक्षवेधी ठरल्या होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपविरोधी वातावरणनिर्मिती करण्यासाठी याचा थोडाफार फायदाही झाला होता. त्यामुळे भविष्यात राज ठाकरे यांनी भाजपशी हातमिळवणी करणे, काँग्रेस-राष्ट्रवादीला परवडण्यारखे नाही.

रंगशारदात मनसेची बैठक; आशिष शेलारांच्या उपस्थितीने भुवया उंचावल्या

तत्पूर्वी सोमवारी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात मनसेची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. मात्र, याठिकाणी आशिष शेलार यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. 

मला हिंदूहृदयसम्राट म्हणून नका -राज ठाकरेंची सूचना

यापूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ भाजपकडून मुंबईत मोर्चा काढला जाणार होता. मात्र, महाविकासआघाडी सरकारने या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, आता मनसेकडून ९ फेब्रुवारीला काढण्यात येणाऱ्या मोर्चाला परवानगी द्यायची की नाही, यावरून सरकारपुढे नवा पेच उभा राहण्याची शक्यता आहे.