रंगशारदात मनसेची बैठक; आशिष शेलारांच्या उपस्थितीने भुवया उंचावल्या

काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त बैठक झाली होती.

Updated: Jan 27, 2020, 01:46 PM IST
रंगशारदात मनसेची बैठक; आशिष शेलारांच्या उपस्थितीने भुवया उंचावल्या title=

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या ठिकाणी भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. देशातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलवून लावण्याच्या मागणीसाठी येत्या ९ तारखेला मनसेकडून मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची रणनीती निश्चित करण्यासाठी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली. 

भाजप 'मनसे'च्या वहाणेनं 'सेने'चा विंचू ठेचू पाहतोय?

यावेळी राज ठाकरे अवघी १० मिनीटे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून बाहेर पडले. मात्र, याठिकाणी आशिष शेलार यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मात्र, आशिष शेलार यांनी आपण वैयक्तिक कामासाठी राज ठाकरे यांना भेटायला आलो होते, असे स्पष्टीकरण तुर्तास दिले आहे. 

मात्र, शेलार यांची ही उपस्थिती भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकते. शिवसेनेने राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेला हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन नव्याने वाटचाल करण्यासाठी राजकीय स्पेस उपलब्ध झाली आहे. अशावेळी मनसेला भाजपची साथ मिळू शकते. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त बैठक झाली होती.

मनसे-भाजप जवळीकीमुळे शिवसेना अस्वस्थ

यापूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ भाजपकडून मुंबईत मोर्चा काढला जाणार होता. मात्र, महाविकासआघाडी सरकारने या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे आता सरकार ९ फेब्रुवारीच्या मोर्चाला परवानगी देणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.