मुंबई : Navneet Rana in Mumbai : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहे. राणा दाम्पत्य रेल्वेने प्रवास करण्याची शक्यता होती. मात्र, शिवसेनेचा विरोध लक्षात घेता त्यांनी विमानाने प्रवास केला. राणा दाम्पत्य विमाने मुंबईत दाखल झाले आहे. त्याआधीच शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. रवी राणा यांनी 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार आहे, असे तसे त्यांनी जाहीर केले होते. दरम्यान, राणा दाम्पत्य मुबंईत येणार असल्याचे वृत्त समजताच शिवसेना आक्रमक झाली असून फिल्डींग लावली आहे. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, राणा दाम्पत्य विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईत येऊ शकते, ही शक्यता होती. याबाबतची माहिती मिळताच शिवसैनिक शुक्रवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) पोहोचले होते. सीएसएमटीच्या फलाट क्रमांकावर 18 वर पहाटेपासूनच शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. मात्र, राणा दाम्पत्य रेल्वेने न आल्याने शिवसेना कार्यकर्ते माघारी फिरलेत.
हनुमान चालीसा म्हणण्यासाठी राणांसोबत 500 हून अधिक कार्यकर्ते असणार आहेत. रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले होते की त्यांनी हनुमान चालिसेचं पठण करावे, नाहीतर आम्ही स्वतः येऊन मातोश्रीसमोर पठण करु. त्याप्रमाणे राणा दाम्पत्य आता आज मुंबईत विमानाने दाखल झाले आहे. दरम्यान, मातोश्री आमचं श्रद्धास्थान आहे इथे यायची कोणी धमकी देत असेल तर शिवसैनिक शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया मातोश्री बाहेरील जमलेल्या शिवसैनिकांनी दिली आहे. मातोश्री बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आणखी शिवसैनिक जमा होण्याची शक्यता आहे.
हनुमान जयंतीच्या दिवशी मी उद्धव ठाकरे यांना आवाहन केले होते महाराष्ट्रात जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत तेव्हा सगळ्या महाराष्ट्राला ग्रहण लागले आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं श्रद्धास्थान मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करा. पण हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर त्यांनी हे पठण केले नाही. त्यामुळे मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचू. ज्याप्रमाणे वारी शांततेत निघते, त्याप्रमाणे आम्ही शांततेत हे पठण करणार आहोत. कोणताही गोंधळ होणार नाही. शांततापूर्वक आम्ही हनुमान चालिसा वाचून महाराष्ट्राच्या शांतीसाठी प्रार्थना करु, असे आमदार रवी राणा म्हणाले होते.