महाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया

Badlapur School Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर रितेश देशमुखने आपला संताप व्यक्त केला आहे. सोबतच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण करुन दिली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 21, 2024, 11:02 AM IST
महाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया  title=

बदलापूरमधील आदर्श शाळेत 3 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. या प्रकरणाचे पडसाद अगदी दिल्लीपर्यंत उमटलेले दिसले. या घृणास्पद घटनेवर अभिनेता, दिग्दर्शक रितेश देशमुखने देखील भावना व्यक्त केली आहे. या घटनेवर रितेश देशमुखने आपला राग, संताप आणि दुःख व्यक्त केलं आहे. बदलापूर प्रकरणाअगोदरच कोलकाता येथील आरजीकर मेडीकल कॉलेजमधील एका ट्रेनी डॉक्टरवर अतिशय अमानुषपणे अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. देशभरात महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत तसेच त्याची तिव्रता देखील अधिकाधिक तीव्र होत आहे. 

रितेश देशमुखने मंगळवारी बदलापूरच्या प्रकरणावर सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरुन आपला संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावर रितेशने आपली उद्विग्न प्रतिक्रिया पोस्ट केली आहे. एवढंच नव्हे तर रितेश देशमुखने 24 वर्षीय अक्षय शिंदे या आरोपीला सर्वात कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील केली आहे. 

रितेश देशमुखचं ट्विट

महाराजांच्या काळातील शिक्षेची मागणी 

आपल्या पोस्टमध्ये रितेश देशमुखने लिहिलं आहे की, एक पालक म्हणून मी या घटनेने पूर्णपणे वैतागलेलो आणि चिडलेलो आहे. दोन चार वर्षांच्या मुलींवर त्यांच्याच शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला आहे. मुलांना त्यांच्या घराप्रमाणेच शाळा ही अतिशय सुरक्षित जागा वाटायला हवी. या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात अशा आरोपींना जी कठोरातील कठोर शिक्षा द्यायचे तीच शिक्षा आज या नराधमाला द्या. त्याचा 'चौरंग' करा. अशा शब्दात रितेश देशमुखने आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

काय आहे प्रकरण? 

बदलापूरमधील आदर्श शाळेतील 3 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. शाळेतील 24 वर्षीय अक्षय शिंदे या आरोपीने हे घृणास्पद कृत्य केलं आहे. 12 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचे पडसाद 20 ऑगस्ट रोजी मुंबईसह दिल्ली आणि संपूर्ण देशभरात उमटले. मंगळवार बदलापूरमध्ये रास्ता रोको, रेल रोको करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्या नराधमाला शिक्षा फक्त फाशीच अशी मागणी केली जात होती.