मुंबई : भाजपवर पुन्हा एकदा शिवसेनेने जोरदार हल्लाबोल चढवला आहे. समाजमाध्यमांचा भाजपकडून आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर होत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. राजकीय धंद्यासाठी फेसबुकचा वापर होत असल्याचा आरोप सेनेने केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मधून भाजपवर निशाणा शाधला आहे.
फेसबुकच्या धोरणाबद्दल द वॉल स्ट्रीट जर्नलने धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टवर कडक कारवाई करणाऱ्या फेसबुकने भाजप नेते आणि संबंधित काही ग्रुपबद्दल नरमाईची भूमिका घेतल्याचं सांगण्यात आले होते. यावरुन आता शिवसेनेनेभाजपावर निशाणा साधला आहे. २०१४ मध्ये निवडणूक जिंकण्यात समाज माध्यमांवरील भाजपच्या पगारी फौजांचे मोठे योगदान होते. तसेच ‘लश्कर ए होयबा’ने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांना निकम्मे ठरवले, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
फेसबुकसारख्या माध्यमांवर वाद-प्रतिवाद व्हायला हरकत नाही. पण द्वेष पसरवून देश आणि समाज तोडणारी भाषा वापरली गेली असेल तर त्यावर पक्षाचा विचार न करता कारवाई व्हायला हवी. द्वेष पसरवणारी व्यक्ती सत्ताधारी पक्षाची आहे म्हणून फेसबुकसारख्या कंपन्यांना डोळझाक करता येणार नाही. तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आला आहेत. तेव्हा उद्योग-व्यवसायतले किमान नीती-नियम पाळावेच लागतील. धंदा कामी होईल म्हणून दळभद्री विचार आणि लढायांचे व्यासपीठ म्हणून फेसबुकसारख्या माध्यमांचा वापर सुरु असेल तर त्याकडे काणाडोळा करता येणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.
फेसबुक आणि ट्विटरसारख्या समजा माध्यमांत नेमके काय चालले आहे, यावर प्रकाशझोत टाकण्याचे काम 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने केले आहे. फेसबुक, व्हाट्सअॅपवर भाजप आणि संघाचेच नियंत्रण आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्याला 'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या वृत्ताचा आधार आहे. समाज माध्यमांतून समाज जोडण्याचे काम न होता समाजात दुभंग आणि द्वेष पसरविण्याचे काम करण्यात येत आहे. समाज माध्यमांतून उदयास आलेल्या असंख्य गोबेल्सनी स्वत:चा कायदा, स्वत:ची न्यायव्यवस्था, स्वत:चे तुरुंग, आरोपींसाठी पिंजरे केले आहेत. एकांगी झोडपेगिरी करत हे सर्व गोबेल्स कोणालाही आरोपी करुन सुळावर चढवत असतात याबाबतचे सत्य अमेरिकन माध्यमांनी उघड केल आहे, असे सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे.
समाज माध्यमांतील हे नवे ‘लश्कर ए होयबा’ राजकीय पक्ष व संघटनांचे पगारी नोकर असतात. ते आपल्या विचारांचा प्रचार करतात तसे इतरांविषयी जहरही पेरत असतात. २०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपाने मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिंकली. त्यात भाजपच्या समाज माध्यमांवर काम करणाऱ्या पगारी फौजांचे योगदान मोठे होते, असा घणाघात शिवसेने भाजपवर चढवला आहे.
दोन समाजात किंवा धर्मात तेढ तसेच दरी निर्माण करण्याचे माध्यम फेसबुक नाही. सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणीही फेसबुकवर काही गटांनी स्वत:चा कायदा, स्वत:ची तपास यंत्रणा, स्वत:चे वेगळे न्यायालयच निर्माण केले आहे. पार्थ पवारचे काय चुकले, काय बरोबर, त्याने आता काय केले पाहिजे, याचे धडे अशा समाज माध्यमांवर देणाऱ्या टोळ्यांना जगाचे तारणहार मानावे काय, सोशल माध्यमांवर एखाद्याची यथेच्छ बदनामी करणे हा आता पगारी व्यवसाय झाला आहे आणि त्यातून कोणीही सुटलेले नाही, असे शिवसेने म्हटले आहे. काल त्याच माध्यमांचा आसरा घेऊन महमोहनसिंग यांची खिल्ली उडवली जात होती. आता पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणीवस यांची खिल्ली उडवतात याचे वाईट वाटते, असे शिवसेने म्हटले आहे.