बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विष्णोई टोळीचे (Lawrence Bishnoi) दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे. यासह पोलिसांनी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल विष्णोई यांना वाँटेड घोषित केलं आहे.
मकोका लावण्यात आलेल्या आरोपींमध्ये एकूण 6 जणांचा समावेश आहे. यामध्ये लॉरेन्स बिष्णोई, अनमोल बिष्णोई, विक्की गुप्ता, सागर पाल, सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापन यांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस गुजरातच्या साबरमती जेलमध्ये बंद असलेल्या लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी लॉरेन्सचा छोटा भाऊ अनमोलविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी केलं आहे. अनमोल सध्या अमेरिकेत असून, तेथून सर्व गुन्हेगारी संबंधित कारवाया करत असल्याची माहिती आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबारानंतर त्याने जबाबदारी स्विकारली होती.
पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षारक्षकाचा जबाब नोंदवला असून त्याआधारे जीवे मारण्याची धमकी आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पण नंतर यामध्ये आणखी तीन कलमांचा समावेश करण्यात आला. आता पोलिसांनी यामध्ये मकोकाही जोडला आहे.
महाराष्ट्र सरकारने 1999 मध्ये मकोका कायदा लागू केला होता. त्याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणतात. संघटित आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी नष्ट करणे हा त्याचा उद्देश आहे. हा कायदा महाराष्ट्र आणि दिल्लीत लागू आहे. मकोकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याअंतर्गत एखाद्यावर कारवाई होत असेल, तर तपास पूर्ण होईपर्यंत त्याला जामीन मिळू शकत नाही. MCOCA च्या धर्तीवर उत्तर प्रदेशात UPCOCA करण्यात आला आहे.
14 एप्रिलला सकाळी 4 वाजून 52 मिनिटांनी सलमान खानचं वांद्रे येथील निवासस्थान गॅलॅक्सीवर दोन शूटर्सनी गोळीबार केला होता. त्यांनी पाच गोळ्या झाडल्या होत्या. यामधील तीन गोळ्यांचा नेम चुकला होता. पण एक गोळी सलमानच्या घराच्या भिंतीवर लागली होती. जर एक गोळी सलमानच्या घरातील ड्रॉईंग रुमच्या भिंतीपर्यंत पोहोचली होती. यानंतर आरोपी दुचाकी चर्चजवळ सोडून पसार झाले होते.
मुंबई पोलिसांनी याप्रकरणी बिहारचे शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांनी गुजरात येथून अटक केली आहे. तसंच त्यांन शस्त्र पुरवणाऱ्या सोनू कुमार, सुभाष चंदर बिष्णोई आणि अनुज थापन यांना क्राईम ब्रांचने पंजाबमधून बेड्या ठोकल्या.