काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी संदीप देशपांडे ताब्यात

दरम्यान, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा जाळून या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. 

Updated: Dec 1, 2017, 01:45 PM IST
काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी संदीप देशपांडे ताब्यात title=

मुंबई : काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजीपार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा जाळून या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. 

आज सकाळी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाची तोडफोड मनसेकडून करण्यात आली होती. संदीप देशपांडे यांनी ट्विट करून या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती.

संजय निरूपमांची टीका 

तर या हल्ल्यावर मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. ‘मनसेच्या नपुंसक कार्यकर्त्यांनी जेव्हा ऑफिसमध्ये कुणीच नव्हतं तेव्हा हल्ला केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई नाही केली तर मनसेला सडेतोड उत्तर दिलं जाईल’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

मनसेकडून कॉंग्रेस कार्यालयावर हल्ला

कॉंग्रेस कार्यालयाची ही तोडफोड मनसेने केल्याचे समोर आले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत ट्विट केले आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..’ असे ट्विट त्यांनी केले आहे. याप्रकरणी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.