मुंबई: देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. रशियाने कोरोनावर लस शोधली. मात्र, आपण केवळ आत्मनिर्भरतेवर प्रवचने झोडत बसलो आहोत, असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला आहे.
त्यांनी म्हटले की, केंद्रातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल पापड खाल्ल्याने कोरोना होत नाही, पापडामुळे कोरोनाचे विषाणू मरतील, असा जाहीर प्रचार करत होते. परंतु, कोरोनाने त्यांनाच गाठल्यामुळे 'पापडा'चे बिंग फुटले आहे. भारत कोरोना विरोधात 'भाभीजी पापड' लाटत बसला आणि तिकडे रशियाने कोरोनावर लस बनवून बाजारात आणली. जागतिक आरोग्य संघटनेलाही त्याबाबत विचारले नाही. याला म्हणतात महासत्ता. आम्ही आमच्याच मस्तीत आहोत, राष्ट्रातील संकटकाळात आम्हीच आमचे निर्णय घेऊ, जगाने नाक खुपसू नये असे बेदरकारपणे वागण्याचा आदर्श आमचे राजकारणी ठेवणार नाहीत, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
याशिवाय, नरेंद्र मोदी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मित्रप्रेमावरही संजय राऊत यांनी खोचक टिप्पणी केली आहे. भारतीय राजकारणी अमेरिकेच्या प्रेमात पागल आहेत. रशियाने बनविलेली लस बेकायदेशील ठरवण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरु झाले आहेत. पण रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ही लस सर्वप्रथम आपल्या तरुण मुलींनाच टोचली व आपल्या देशात आत्मविश्वास निर्माण केला. आत्मनिर्भरतेचा पहिला धडा रशियाने घालून दिला. आपण आत्मनिर्भरतेवर केवळ प्रवचनेच झोडत बसलो आहोत, अशी टीकाही राऊत यांनी केली.
तसेच ही लस अमेरिकेत तयार झाली असती तर आपण डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले असते. परंतु, आज ज्या मंत्र्यांना व बड्या अधिकाऱ्यांना कोरोना झाला आहे, त्यांनी रशियाची लस गुप्त मार्गाने आधीच आणली असेल. पण देशातील लाखो गोरगरिबांना वाली कोण, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. याशिवाय, कोरोनाच्या भीतीमुळे दिल्ली दहशतीखाली आहे. मोदी व शहा यांची भीती होतीच, पण कोरोनाची भीती त्यांच्यापेक्षा जास्त आहे. या सगळ्यामुळे कोणाच्याही हाताला काम नाही. देश चालवणाऱ्या दिल्लीलाही काम हवे आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.