...कमी पडत असेल तर सरकार पाडायला आर्मी आणा! संजय राऊत

'प्रमुख तपास यंत्रणांचा वापर तुम्ही जेव्हा राजकारणासाठी करता तेव्हा तुम्ही देशाच्या सुरक्षेलाही सुरुंग लावता आणि आज ते होतंय'

Updated: Jul 2, 2021, 08:09 PM IST
...कमी पडत असेल तर सरकार पाडायला आर्मी आणा! संजय राऊत title=

रुचा वझे, झी 24 तास, मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून तिनही पक्षातील नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर सुरु आहे, तीन पक्षांचं सरकार अस्थिर असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. या सर्व आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी झी 24 तासशी बोलताना रोखठोक उत्तरं दिली आहेत. 

ED, CBI कमी पडत असेल तर...

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून नेत्याना अडचणीत आणण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर सुरु आहे. सीबीआय, इन्कम टॅक्स आणि आता ईडीचं नविन सुरु झालं आहे. आमदारांवर, मंत्र्यांवर दबाव आणून त्यांना हे सरकार अस्थिर करायचंय असं चित्र दिसतंय अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अशा प्रकारे दबाव आणून आमदारांना पक्ष सोडायला लावायचं, राजीनामे द्यायला लावायचं, पक्षांतर करायला लावायचं. पण तुम्ही किती काळ अशा प्रकारच्या दबावाचं राजकारण करणार आहात. आता या सरकारला दोन वर्ष झालेली आहेत. विरोधी पक्षांनी जरूर लढा द्यावा, संघर्ष करावा, किंवा राज्य त्यांना आणायचं असेल त्यांचं तर त्या पद्धतीने राजकीय खेळी करावी. पण ती खेळी करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा अशा प्रकारे खेळखंडोबा करु नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तपास यंत्रणांनी निष्पक्ष काम करण्याची गरज आहे. त्यांचा राजकीय हत्यार म्हणून वापर होऊ नये, या तीन प्रमुख तपास यंत्रणांचा वापर तुम्ही जेव्हा राजकारणासाठी करता तेव्हा तुम्ही देशाच्या सुरक्षेलाही सुरुंग लावता आणि आज ते होतेय, पण तरीही राज्यातलं सरकार मजबूत आहे आणि राहिल. असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. आता इतके दिवस तुम्ही ईडी आणताय, सीबीआय आणताय तरी सरकार पडत नाहीए. मग मी त्यांना आता सांगतो आता आर्मीच आणायची राहिली आहे इथे. रणगाडे, सैन्य आणा महाराष्ट्रामध्ये, आणि मंत्रालयासमोर, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आमच्या सर्वांच्या घरासमोर तोफा लावा. सरकार तुम्हाला पाडायचंच आहे, तेवढंच करायचं तर करा असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

राजकीय सुडाची भावना

अचानक या भानगडी काढण्याचं काम सुरु झालं आहे. त्यामागे राजकीय सुडाची भावना स्पष्ट दिसतेय असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. अनेक ठिकाणी अनियमितता झाली असेल, पण त्यासाठी महाराष्ट्रात तपास यंत्रणा आहेत ना, तक्रार जर केली कुणी तर त्याचा तपास होतो, त्यासाठी दिल्लीतून ईडीला यायची गरज आहे असं मला वाटत नाही, अशा प्रकारचे अनियमित व्यवहार देशभरात कुठे ना कुठे झाले आहेत. राजकारणामध्ये काम करताना, समाजकारणात काम करताना, सहकार क्षेत्रात काम करताना, कुठे तरी या चुका होत असताता, त्या दुरुस्त करण्याची संधीही मिळाली पाहिजे. नाहीतर संपूर्ण सहकारक्षेत्र कोलमडून पडेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

आमच्या पाठीत सर्वाधिक खंजीर कुणी खुपसले

महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकमेकांच्या हाती खंजीर घेऊन बसलेत असा टोला केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावलाय, यावर बोलताना भाजपनं आजवर शिवसेनेच्या पाठीत सर्वाधिक खंजीर खुपसले, असा पलटवार शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. महाराष्ट्रात चंद्रकांतदादा पाटील असतील, देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील विरोधी पक्ष म्हणून त्यांनी अशा प्रकारच्या तोफा डागतच राहिल्या पाहिजेत. आणि त्यांचं ते कामच आहे. त्याच्याविषयी आम्हाला अजिबात वाईट वाटत नाही. नेम धरून मारा, पण तुमचे नेम चुकतायत. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. 

अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल की नाही याबाबत साशंकता आहे. पण ती जागा काँग्रेस पक्षाची आहे. त्यांचा जो उमेदवार असेल तोच अध्यक्ष होईल, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल

महाराष्ट्रात फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना पाच वर्ष उत्तम काम केलेलं आहे. विरोधी पक्ष नेते म्हणूनही ते चांगलं काम करु लागले आहेत. आणि जर राष्ट्राला गरज असेल, त्यांच्या पक्षाला दिल्लीत गरज असेल तर त्यांचे  हायकमांड त्यांना जबाबदारी देतील. महाराष्ट्रातील एक नेता दिल्लीत जातो तर त्याचं स्वागत करायला हवं, असं संजय राऊत यांनी म्टलं आहे.