मुंबई : राज्यात डिसेंबरच्या अखेरीस कोरोनाचा कहर पुन्हा वाढल्याने राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यासह मुंबईत पुन्हा शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. २७ जानेवारीपासून मुंबईत शाळा सुरु झाल्या आहेत.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळत शाळा पुन्हा सुरु कराव्यात यासाठी शिक्षक-पालक संघटनेने मागणी केली होती.
पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग पूर्णवेळ सुरु करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा पूर्णवेळ सुरु होऊ शकतात तर मुंबईतील का नाही असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. मुंबईतील शाळा ही पूर्ण क्षमतेने भरवण्यात याव्यात अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय ते होऊ नये म्हणून खबरदारी घेऊन शाळा सुरु करण्याची मागणी पॅरेंट्स असोसिएशन ऑफ मुंबई यांच्याकडून करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात पूर्ण वेळ शाळा
कोरोना संसंर्गाचं प्रमाण कमी झाल्याने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून पूर्णवेळ सुरु करण्यात आले आहेत. इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग गेल्या आठवड्यापासून पूर्ण वेळ सुरु झाले आहेत.
अजित पवार यांचं शिक्षकांना आवाहन
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षकांना आवाहन केलं आहे. शिक्षकांनी शनिवारी आणि रविवारी शाळा सुरु ठेवून अभ्यासक्रम भरुन काढला पाहिजे, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांची पावणेदोन वर्ष वाया गेली आहेते, ती भरून निघाली पाहिजेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.