शेअर बाजारात भूकंप; लोअर सर्किट लागल्याने व्यवहार ठप्प

२००८ नंतर शेअर बाजारात पहिल्यांदाच लोअर सर्किट लागले आहे. 

Updated: Mar 13, 2020, 10:08 AM IST
शेअर बाजारात भूकंप; लोअर सर्किट लागल्याने व्यवहार ठप्प title=

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव आणि कोरोनाच्या धास्तीमुळे शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात अभूतपूर्व घसरण पाहायला मिळाली. बाजार उघडल्यानंतर गुंतवणुकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशकांनी धोक्याची खालची पातळी गाठली. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजारात लोअर सर्किट लागले. परिणामी पुढील तासभर राष्ट्रीय शेअर बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत. २००८ नंतर शेअर बाजारात पहिल्यांदाच लोअर सर्किट लागले आहे. बाजार उघडल्यानंतर Nifty 50 ने ९६६.१० अंकांची घसरण नोंदवत ९००० पेक्षा खालची पातळी गाठली. तर सेन्सेक्समध्ये तब्बल ३००० अंकांची घसरण पाहायला मिळाली. बँकिंग क्षेत्र आणि माहिती व तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. या कंपन्यांच्या समभागात १० टक्क्यांपेक्षा अधिक घसरण पाहायला मिळाली.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या धास्तीमुळे आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये मोठ्याप्रमाणात पडझड होताना दिसत आहे. तसेच सौदी अरेबिया आणि रशियात तेल दरावरुन युद्ध सुरु आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. तसेच रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर लादलेल्या निर्बंधांमुळेही भांडवली बाजारात प्रचंड नकारात्मक वातावरण आहे.

भांडवली बाजारासाठी आजचा दिवस 'ब्लॅक फ्रायडे' ठरण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात होती. ही अपेक्षा खरी ठरली असून आता बाजारातील व्यवहार पुन्हा सुरु झाल्यानंतर काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी युरोप, अमेरिका आणि आशियातील सर्व बाजारांत आज सकाळी मोठ्या घसरणीचे सत्र कायम राहिले आहे. जपान आणि अमेरिकेत घसरण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत २० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.