Maharashtra Politics : दसरा मेळाव्यासाठी (Dussehra 2022) शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्यांची भाषणासाठी चढाओढ सुरू झाली आहे. लाखोंच्या गर्दीपुढे भाषण करण्याची संधी मिळावी यासाठी दोन्ही गटांची नेतेमंडळी मोर्चेबांधणी करत आहेत. लाखोंची गर्दी दोन्ही मेळाव्यांना होण्याची अपेक्षा आहे. त्यातच यावेळी दोन्ही गट एकमेकांवर तुफान आरोप प्रत्यारोप करणार आहेत. त्यामुळे या दसरा मेळाव्यात आपल्यालाही भाषणाची संधी मिळावी यासाठी नेतेमंडळी मोर्चेबांधणी करत आहेत.
ठाकरे गटाकडून नेतेपद बहाल केलेले खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, माजी महापौर किशोरी पेडणेकर तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, रामदास कदम, दीपक केसरकर यांचा शिंदे गटाकडून विचार सुरू असल्याची माहिती आहे.
शरद पवारांचा सल्ला
दसरा मेळाव्यात मर्यादा ओलांडू नका, कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य करू नका असा सल्ला शरद पवारांनी (Sharad Pawar) ज्येष्ठत्वाच्या नात्याने दोन्ही गटांना दिलाय. दसरा मेळाव्याशी राष्ट्रवादीचा (NCP) कोणताही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, शरद पवारांनी राष्ट्रावादीचा कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं असलं तरी ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादी मैदानात उतरलीय. मातोश्री (Matoshree) आणि सेना भवनाबाहेर (Sena Bhavan) राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार बॅनरबाजी करत मेळाव्यासाठी पाठिंबा दर्शवलाय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा देण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आलीय. 'एक संघटना, एक विचार, एकच मैदान शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू द्या खूप खूप शुभेच्छा' असा उल्लेख राष्ट्रवादीच्या बॅनरवर करण्यात आलाय.
महापालिकेच्या सत्तेसाठी चढाओढ
ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा अनेक नेत्यांची भविष्यातली राजकारणाची दिशा ठरवणारा असणार आहे. महापालिकेच्या सत्तेसाठी (Municipal Corporation Election 2022) चढाओढ रंगणार आहे. मुंबईसह ठाण्याचा बालेकिल्ला ठाकरे गटाकडून हिसकावून घेण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न आहेत. मुंबई, ठाण्यात स्वतः आदित्य ठाकरे, अनिल परब, किशोरी पेडणेकर, सदा सरवणकर, श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
तर नाशिक जिल्ह्यातून जास्तीत जास्त नाशिककरांना मेळाव्यासाठी नेण्याची जबाबदारी हेमंत गोडसेंवर आलीय. पालकमंत्री दादा भुसेंवर जिल्ह्यात शिंदे गटाचं संघटन वाढवण्याचं मोठं आव्हान आहे. संभाजीनगरमध्ये तर नेत्यांची कांटे की टक्कर आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जळगाव जिल्ह्यातून गुलाबराव पाटलांना शिंदे गट दसरा मेळाव्यात भाषणाची संधी मिळणार आहे.