मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हल्लाबोल केला आहे. मोदींच्या नेतृत्वात हा पराभव असल्याची टीका त्यांनी केली आहे. अर्थकारण नीट हातळता आले नसल्यामुळे हा पराभव झाला असून, पूर्ण देशात या पुनरावृत्ती होणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने अर्थकारण योग्य पद्धतीने हाताळले नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था संकटात आली आहे. मंदीचे चित्र दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याराज्यातील गुंतवणुकीचे वातावरण कमी होत आहे. या सगळ्याचा दुष्परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे पवार म्हणालेत. दरम्यान, CAA आणि NRC आणून सरकार स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच समाजात धार्मिक अंतर वाढवण्याचाही या सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला.
झारखंड निवडणुकीचे निकाल पाहता देशातील जनता भाजपाविरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रातली सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरूनही भाजपाच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं. त्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे धन्यवाद देतो. #JharkhandElectionResults#jharkhandresult pic.twitter.com/3ZBl42mr2y
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 23, 2019
नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. खरं म्हणजे याची फारशी आवश्यता नव्हती. परंतु हा प्रश्न उपस्थित करुन समाजामध्ये आणि देशात विविध घटकामध्ये धार्मिक अंतर वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कालच्या वक्तव्याचे मला आश्चर्य वाटले. त्यांचे भाषण झाले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, या विषयावर आम्ही मंत्रिमंडळामध्ये चर्चा केलेली नाही. तसेच संसदेतही चर्चा केलेली नाही. एनआरसीबाबत चर्चा झाली नाही, असे एकीकडे सांगतात. पण संसदेमध्ये गृहमंत्री सांगतात आणि मोदी हे आज जे काही सांगतात ती वस्तुस्थिती याच्यामध्ये अंतर आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि दोन्ही सभागृहात सरकारकडून सांगण्यात आले. त्यात अंतर दिसत आहे. या सगळ्या गोष्टीचा परिमाण हे कारण नसताना देशात असवस्था दिसून येत आहे. मोर्चा, आंदोलन सुरु आहे. त्यामुळे असेच वातावरण राहिले तर झारखंडच्या जनतेप्रमाणे अन्य राज्यातही लोक निर्णय घेतील, असे पवार म्हणालेत.
पंतप्रधान म्हणाले की #CAA व #NRC या विषयांवर मंत्रिमंडळात फारशी चर्चा झाली नाही. मात्र गृहमंत्री स्पष्ट म्हणाले होते की NRC आणणार. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातही याचा उल्लेख होता. यानंतरही चर्चा झाली नसल्याचे पंतप्रधान म्हणतात, त्यामुळे ते जे सांगतात आणि वस्तुस्थिती यात तफावत आहे. pic.twitter.com/yctZK5ytxn
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 23, 2019
मोदी यांच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारले आहे, अशी बोचरी टीका यावेळी पवार यांनी केली आहे. केंद्रातली सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरुनही झारखंडच्या जनतेने भाजपला स्विकारलेले नाही. त्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे धन्यवाद देतो, असे पवार म्हणालेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
झारखंडसह, महाराष्ट्र मध्यप्रदेश, छत्तीसगड, राज्यस्थान या पाच राज्यातून भाजप हद्दपार झाले आहे. झारखंड या राज्यात आदिवासी आणि गरीब लोकांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची वापरली गेलेली सत्तेची ताकद व आर्थिक ताकद न जुमानता इथल्या जनतेने भाजपला नाकारले आहे . सत्तेवर आलेल्या घटकांनी (केंद्र सरकार) योग्य पावले उचलायची असतात. आत्ताचे सत्ताधारी परिस्थिती चिघळेल अशी भूमिका घेताना दिसत आहेत, असे ते म्हणालेत.
महाराष्ट्रातून रस्ता मिळाला, त्यातूनच झारखंडमध्ये भाजपाच्या विरोधात सगळे एकत्र आले असंही वक्तव्य शरद पवार यांनी केलं. झारखंड विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाला धडा शिकवला. इतर राज्यांमध्येही संधी मिळाल्यानंतर जनताच भाजपाला धडा शिकवेल असंही शरद पवार यांनी म्हटले आहे.