मुंबई : राज्य सहकारी गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार चौकशीसाठी न बोलावताच ईडी कार्यालयात धडकणार होते. दुपारी १.३० वाजता शरद पवार ईडी कार्यालयाकडे निघणार होते. परंतु, याआधी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर शरद पवारांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी, आपल्यावर करण्यात आलेली कारवाई ही राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप पवारांनी केलाच परंतु, आज ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचं पवारांनी म्हटलंय. यावेळी पवारांसोबत धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील या राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते.
खरं तर ठरल्यानुसार पवार आज दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयात जाणार होते... पण पवारांनी यायची आवश्यकता नाही, असं ईडीनं पवारांना ईमेलच्या माध्यमातून कळवलं होतं. त्याचबरोबर पोलीस आयुक्त संजय बर्वे आणि त्याआधी सहपोलीस आयुक्त विनय चौबे यांनीही पवारांच्या घरी भेट घेऊन त्यांनी ईडी कार्यालयात जाऊ नये, अशी विनंती केली होती. त्यानंतर पवारांनी स्वतःच ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला. 'सहपोलीस आयुक्त मला भेटून गेले आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे ईडी कार्यालयात जाऊ नका अशी विनंती त्यांनी केली. मी गृहखातं सांभाळलं आहे माझ्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सामान्यांना त्रास होऊ नये, म्हणून मी ईडी कार्यालयात जायचा निर्णय तहकूब केला आहे' असंही पवारांनी स्पष्ट केलं.
ईडीला लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना ईडीनं आज यायची आवश्यकता नसल्याचं म्हटलं. तसंच जेव्हा यायचं असेल तर कळवणार असल्याचंही ईडीनं म्हटल्याचंही त्यांनी म्हटलं.
मी बँकेचा सभासदही नव्हतो. परंतु, केवळ राजकीय हेतूनं विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. असं असलं तरी आपण ईडीच्या चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार, असं शरद पवारांनी म्हटलंय.
ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला, त्या सगळ्यांचे आभारही पवारांनी मानलेत. शिवसेना नेते संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शरद पवार यांना आपला पाठिंबा दर्शवला होता. 'मी विरोधी पक्षनेता असल्यापासून विधानसभेत राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहाराचा पाठपुरावा केला आहे. सुरुवातीपासूनच या गैरव्यवहारात शरद पवारांचे नाव नव्हते, हे मी जबाबदारीने सांगू शकतो. त्यामुळे आता अचानक गैरव्यवहारात शरद पवारांचे नाव कसे पुढे आले?' अशी शंका उपस्थित करत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनीदेखील शरद पवारांची पाठराखण केली होती.