मंत्रिमंडळ विस्तारावरुन शरद पवारांचा काँग्रेसला टोला

शरद पवारांचा नाव न घेता टोला... 

Updated: Dec 23, 2019, 06:31 PM IST
मंत्रिमंडळ विस्तारावरुन शरद पवारांचा काँग्रेसला टोला title=

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. पण यावेळी त्यांनी काँग्रेसला ही टोला लगावला. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने तयारी पूर्ण केली आहे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शरद पवारांना विचारलं असता त्यांनी म्हटलं की, 'मंत्रीमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मंत्रीमंडळ विस्तारासाठी राष्ट्रवादीला तयारी करावी लागत नाही. आम्हाला परवानगी घ्यायला कुठे जावं लागत नाही.'

शरद पवारांनी नाव न घेता काँग्रेसला हा टोला लगावला आहे. कारण शिवसेना-राष्ट्रवादीची मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण झाली असली तरी त्यांना काँग्रेसच्या यादीमुळे थांबाव लागत आहे. काँग्रेसच्या यादीवर आज दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या याबाबत निर्णय घेणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते दिल्लीत दाखल ही झाले आहेत. आज ही यादी निश्चित होईल अशी शक्यता होती. पण अजूनही याबाबत कोणतीही माहिती आलेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची देखील शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक होत आहे. उद्या मंत्रीमंडळ विस्तार करायचा की नाही यावर चर्चा होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होत असून या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील हे देखील उपस्थित आहेत.