शरद पवारांचे राज्यपालांना खोचक पत्र

शरद पवार राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात..

Updated: Oct 28, 2020, 05:23 PM IST
शरद पवारांचे राज्यपालांना खोचक पत्र title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आपले 'जनराज्यपाल' हे पुस्तक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना दोन ओळीच्या पत्रासह पाठवले होते.  पुस्तक मिळाल्याचा अभिप्राय कळवताना शरद पवारांनी पाठवलेल्या पत्रात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निधर्मवादावरून डिवचले आहे. 

शरद पवार राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात..

महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित 'जनराज्यपाल :भगतसिंह कोश्यारी' हे चित्ररूप कॉफी टेबल बुक प्राप्त झाले. वास्तविक भारतीय संविधानात 'जनराज्यपाल' असा नामोल्लेख आढळत नाही.  तरीही राज्य शासनाच्या वतीने अशा शीर्षकाचे सुबक छपाई असलेले, आपल्या एका वर्षाच्या मर्यादीत कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक मला पाठवण्यात आले याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.

 कॉफी टेबल बुकचे अवलोकन केले असता त्यामध्ये आपल्या मर्यादीत कालावधीतील एखाद दुसरा वगळता शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ यासारखे सोहळे, उच्चपदस्थ अभ्यागतांच्या, मान्यवरांच्या गाठीभेटी, इतर सामाजिक - सांस्कृतिक कार्यक्रम व त्यातील सहभागाची छायाचित्र पाहण्यात आली. 

तसेच निधर्मवादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद देखील या माहीती पुस्तकात दिसून आली नाही.  असो आपण आठवणीने आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीचा लेखाजोखा पाठवला याबद्दल मी आपला पुनश्च आभारी आहे. 

या ठिकाणी शरद पवारांनी खोचकपणे ऐतिहासिक लेखाजोखा असा उल्लेख केला आहे. शरद पवारांनी लिहिलेल्या या पत्रात दोन गोष्टींचा संदर्भ पाहायला मिळतो. राज्यपालांच्या कार्यकाळात अनेक शपथविधीचे कार्यक्रम झाले, त्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचाही समावेश आहे, त्याचा उल्लेख ही पवारांनी यात केला आहे. तसेच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आपण सेक्युलर कधी झालात? अशा आशयाचं पत्र पाठवलं होतं, त्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपालांच्या या भाषेविषयी नाराजी व्यक्त केली होती. अशा दोन मुद्यांचा उल्लेख यात करण्यात आला आहे. यामुळे या पत्राची जोरदार चर्चा रंगली आहे.