Sharad Pawar Live : महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज शपथ घेतली. राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गेले काही दिवस आसाम राज्यात या राज्यात विधानसभेचे काही सदस्य गेले होते. त्यात जी मागणी असावी ती मागणी राज्याचं नेतृत्व बदलाची होती.
आसाममध्ये जे गेले त्याचं ज्यांनी नेतृत्व केलं त्यांची उपमुख्यमंत्रीपदापेक्षा जास्त अपेक्षा नव्हती, पण भाजपमध्ये आदेश हा जो आला मग तो दिल्लीचा असेल किंवा नागपूरचा असेल त्याचा परिणाम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदेवर पडली. ज्याची कल्पना कोणाला नव्हती, कदाचित शिंदेंनाही नसावी असं शरद पवार यांनी म्हटलंय.
आताचे जे मुख्यमंत्री आहेते ते ठाण्याचे प्रतिनिधी आहेत. पण ते मूळ साताऱ्याचे आहेत. योगायोगाने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे साताराचे होते. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो, माझं मूळ गावही साताऱ्यात आहेत. बाबासाहेब भोसले हे सातारा जिल्ह्याचेच. पृथ्वीराज चव्हाणही सातारा जिल्ह्यातलेच होते. सातारा जिल्ह्याला लॉटली लागली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही असं शरद पवार यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांना मी शुभेच्छा दिल्या. मु्ख्यमंत्री झाल्यानंतर तो राज्याचा प्रमुख होतो. आणि राज्याच्या सर्व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडून कामगिरी व्हावी अशी अपेक्षा आहे, यासाठी माझ्याकडून शुभेच्छा.
38 आमदार बाहेर नेणं ही साधी गोष्ट नाही, ती नेण्याची कुवत एकनाथ शिंदे यांनी दाखवली, त्यातच त्यांच यश आहे. याची तयारी आधीच होती. सूरत, गुवाहाटी, गोवा इथली तयारी हे काय एका दिवसात होऊ शकत नाही अशी शक्यताही शरद पवार यांनी बोलून दाखवली.
उद्धव ठाकरे यांनी संघटनेची, विधीमंडळाची जबाबदारी पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली होती. त्याचा हा कदाचित परिणाम आहे का हे कळत नाही असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
शिवसेना संपुष्टात आलेली नाही, येणार नाही. यापूर्वी छगन भुजबळ यांनी बंड केलं, काही झालं नाही, उलट भुजबळांसोबत जे आमच्याकडे आले ते सर्व पराभूत झाले. त्यानंतर नारायण राणे यांनी बंड केलं ते ही पराभूत झाले. त्यामुळे शिवसेनेत हे काही नविन नाही. त्यांच्याबाबत शिवसैनिकांनी वेगळी भूमिका घेतली असंही शरद पवार यांनी सांगितलं.