सेना विरुद्ध राणा! कोण फायर ? कोण फ्लॉवर?

वादळ शमणार की आगामी काळात संघर्ष आणखी वाढणार?

Updated: Apr 23, 2022, 08:31 PM IST
सेना विरुद्ध राणा! कोण फायर ? कोण फ्लॉवर?  title=

Shivsena vs Rana : मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणारच असा निर्धार करून राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं आणि ठिकठिकाणी राडा सुरू झाला. राणा दाम्पत्याला घराबाहेर पडू देणारच नाही अशी भीमगर्जना करत शिवसैनिकांनी त्यांच्या खारमधल्या घरालाच गराडा घातला. इतकच नाही तर बॅरिकेट्स तोडून घरात घुसण्याचा प्रयत्नही केला. तर तिकडे अमरावतीतही राणांच्या घराभोवती शिवसैनिकांनी जोरदार राडा केला. 

शिवसैनिकांची एक तुकडी खारमध्ये तर दुसरी तुकडी मातोश्रीच्या अंगणात ठाण मांडून होती. लक्ष्य होतं राणा दाम्पत्य. मात्र राणा दाम्पत्यही मातोश्रीवर हनुमान पठण करण्यावर शनिवारी सकाळपर्यंत ठाम होतं. तर शिवसैनिकांनी राणांना थेट ठोकून काढण्याची तयारी केली होती. त्यासाठी राणांच्या घराबाहेर बंटी-बबली लिहलेली अँबुलन्स आणि स्ट्रेचरच तयार ठेवलं होतं. 

या सगळ्यांमध्ये साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या त्या एक शिवसैनिक आजीने. भर उन्हात भजनावर ताल धरत या आजी राणा दाम्पत्याची वाट पाहत होत्या. पुष्पा स्टाईल झुकेगा नही साला असं म्हणत त्यांनी राणा दाम्पत्यालाच आव्हान दिलं. 

अखेर शिवसेना विरूद्ध राणा दाम्पत्य या संघर्षात राणा दाम्पत्यानं माघार घेतली. त्यानंतर शिवसैनिकांनी मोठ्या लढाई जिंकल्याचा अर्विभावात मोठा जल्लोष केला. एवढंच नव्हे तर पेढेही वाटले. मात्र हे वादळ एवढ्यावरच शमणार नाही. आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होणार. यात शंका नाही.