पंतप्रधान आणि ठाकरे बंधू उद्या एकाच मंचावर येणार? 'त्या' सोहळ्याची उत्सुकता

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता  

Updated: Apr 23, 2022, 07:54 PM IST
पंतप्रधान आणि  ठाकरे बंधू उद्या एकाच मंचावर येणार? 'त्या' सोहळ्याची उत्सुकता title=

मुंबई : शिवसेना (ShivSena) आणि भाजपचे (BJP) राज्यातील नेते एकमेकांसमोर उभे ठाकले असताना उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. उद्या पंतप्रधान मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 

विशेष म्हणजे मंगेशकर कुटुंबीय आणि राज ठाकरे यांचे (Raj Thackeray) सौदार्हाचं संबंध बघता तेदेखील या सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. त्यामुळे उद्या मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दोन ठाकरेंना एका मंचावर बघण्याचा सुवर्णयोग साधला जाऊ शकतो. 

पंतप्रधानांचा मुंबई दौरा
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. उद्या म्हणजे 24 एप्रिलला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. 

लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार देशसेवा आणि समाज कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात देशाप्रती केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उद्या संध्याकाळी 5 वाजता मुंबई विमानतळावर आगमन होईल. यंदाचा सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. उद्या संध्याकाळी सोहळा पार पडेल.

राज्यात सध्या सुरु असलेलं राजकीय वातावरण, आरोप प्रत्यारोप, शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात सुरु असलेलं कोल्ड वॉर, मनसेनं उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा अशा परिस्थितीत प्रमुख पक्षातील नेते एका मंचावर दिसणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, पंतप्रधानांचा दौऱ्यासाठी पोलीस आपापल्या पद्धतीने तयारी करत आहेत. पंतप्रधानांचा दौरा निर्विघ्नपणे पार पडेल असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.