मुंबई : एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला गळती लागली. ही गळती अजूनही कायम आहे. आमदारांपासून सुरु झालेली गळती थेट खासदार, नगरसेवकांपर्यंत येऊन पोहचली. त्यामुळे शिवसेनेला खिंडार पडलं. परिस्थिती इतकी हातातून गेली की आता थेट शिवसेनेच्या राजकीय अस्तित्तवाचा प्रश्न निर्माण झाला. मुद्दा आता शिवसेनेच्या चिन्हापर्यंत येऊन पोहचला आहे. मात्र या अशा परिस्थितीतही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डगमगून न जाता पुन्हा एकदा पक्षवाढीसाठी तयारीला लागलेत. त्यानुसार उद्धव यांनी शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. (shiv sena chief uddhav thackeray give order to party district head in maharashtra over to upcoming elections after eknath shinde mla group rebel)
शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर मातोश्रीवर पक्षाला नवी उभारी देण्यासाठी संघटना पातळीवर बैठकींचा सपाटा सुरु आहे. त्यानुसार आज उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुखांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत उद्धव यांनी जिल्हाप्रमुखांना आणि शिवसैनिकांना महत्त्वाचे आदेश दिले.
"लढाईला तयार राहा, कुणी गेलं आहे, याचा विचार करु नका. या निवडणुकीत शिवसेना मजूबत असल्याचे दाखवून द्या", असे आदेश पक्षप्रमुखांनी या बैठकीत दिले. तसंच आघाडी करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर घ्या, अशी सूचनाही ठाकरे यांनी या दरम्यान केली.
दरम्यान एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका देण्याच्या तयारीत आहे. शिवसेना खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक काल रात्री बैठक झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री निवासस्थानी ही बैठक झाल्याचं म्हटलं जात आहे.