मुंबई : Shiv Sena chief Uddhav Thackeray's birthday : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या शुभेच्छा देतानाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री केला आहे. त्यामुळे त्यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरुआहे. शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख मानण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे.
राज्यात सध्या खरी शिवसेना कोणाची यावरुन शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये संघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर सत्तांतर झाले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या बंडखोरांवर जोरदार टीका केली जात आहे. बंडखोर आमदारांकडूनही या टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे संघर्ष वाढत आहे. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महत्वाचे म्हणजे यामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला आहे. शिंदेंच्या ट्विटमध्ये 'पक्षप्रमुख' असा उल्लेख नाही. शुभेच्छांपेक्षा राजकीय अनुल्लेखाचीच चर्चा आहे.
काय म्हटलंय एकनाथ शिंदेंनी ट्विटमध्ये पाहा. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. फडवणवीस यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो!, असे म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करुन तसेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असे म्हटलंय. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख हा उल्लेख टाळला आहे.
माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!
मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो! pic.twitter.com/Ob1Rb1UUgm— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 27, 2022