सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरे यांना धक्का, शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाच्या हातात?

धनुष्यबाण मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी  

Updated: Aug 4, 2022, 08:41 PM IST
सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरे यांना धक्का, शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाच्या हातात? title=

Maharashtra Politics : सत्तासंघर्षावर गुरूवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठा झटका बसलाय. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी घेण्यास निवडणूक आयोगाला मनाई करावी, अशी मागणी ठाकरे गटानं केली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं ही मागणी फेटाळलीय.

चिन्हाबाबत सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?
कोर्टात सुनावणी सुरू असेपर्यंत निवडणूक आयोगानं शिवसेना कुणाची याबाबत निर्णय घेऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केली. तर एखादा गट मूळ पक्ष असल्याचा दावा करत असेल तर आयोगाला निर्णय घ्यावा लागेल, असं निवडणूक आयोगाचे वकील अरविंद दातार यांनी सांगितलं.

तेव्हा निवडणूक आयोगाची सुनावणी थांबवता येणार नाही. निवडणूक आयोग सुनावणी घेऊ शकतो, मात्र निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश सरन्यायाधीश रामण्णा यांनी दिले.

त्यामुळं आता सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात, तर धनुष्यबाण आणि पक्ष कुणाचा यावर निवडणूक आयोगात अशा दोन दोन लढाया ठाकरे विरुद्ध शिंदे गटाला लढाव्या लागणार आहेत...

लवकरच राज्यात स्थनिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत धनुष्यबाण आपल्यालाच मिळावं, यासाठी दोन्ही गटांनी प्रयत्न सुरू केलेत. धनुष्यबाण चिन्ह मिळवायचं असेल तर संसदीय पक्षासह मूळ पक्षातही उभी फूट पडल्याचं सिद्ध करावं लागणार आहे.

त्यासाठी आमदार आणि खासदारांपाठोपाठ जास्तीत जास्त जिल्हाप्रमुखांना देखील गळाला लावण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे गटानं सुरू केलेत. तर आपणच मूळ शिवसेना आहोत, हे पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी ठाकरे गटानं प्रतिज्ञापत्र गोळा करण्याची मोहीमच सुरू केलीय. निवडणूक आयोग आता नेमके कोणते पुरावे ग्राह्य धरणार, त्यावर धनुष्यबाण कुणाच्या हातात पडणार, याचा फैसला होणार आहे.