शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधीसह काँग्रेस नेत्यांची घेतली भेट

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी  राहुल गांधी यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या.  

Updated: Jan 15, 2020, 01:25 PM IST
शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधीसह काँग्रेस नेत्यांची घेतली भेट

मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापाठोपाठ सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल आणि माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांचीही भेट घेतली. संक्रांतीच्या निमित्ताने ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस पक्षाशी संबंध चांगले व्हावेत यासाठी आदित्य ठाकरे आज राहुल गांधींची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी असली तरी ती आपल्या जागी ठेवून सरकारसोबत सरकार कसे चालवायचे, तसेच केंद्र सरकारविरोधात काय भूमिका घ्यायची यासंदर्भात ही भेट असल्याचे मानले जाते आहे.

आदित्य ठाकरे यांनी खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट झाली. आदित्य ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. भेटीचं नेमके कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

याआधी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचे निमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. पण त्यावेळी राहुल गांधी आणि त्यांची भेट होऊ शकली नव्हती. उद्धव ठाकरे सरकारचा शपथविधी पार पडला तेव्हाही राहुल गांधी अनुपस्थित होते. दरम्यान अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

आदित्य ठाकरे दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी फेसबुक-इन्स्टाग्रामच्या मुख्यालयाला भेट दिली. तेथील कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या. यानंतर त्यांनी ट्विटवर फोटो शेअर करत या भेटीमुळे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकार खूप काम करु शकते, याची माहिती मिळाल्याचे म्हटले होते. यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या.