मुंबई: शिवसेनेकडून प्रजासत्ताक दिनी सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीला राज्यातील नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. ही योजना सुरु झाल्यापासून अवघ्या १७ दिवसांच्या काळात राज्यात २ लाख ३३ हजार ७३८ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. या योजनेतंर्गत राज्यातील गरीब आणि कष्टकऱ्यांना अवघ्या १० रुपयांत जेवण देण्यात येत आहे. ठाकरे सरकारची ही योजना चांगल्याच चर्चेचा विषय ठरली होती.
तुमची 'शिवशाही थाळी' तर आमची 'दीनदयाळ थाळी'; भाजपकडून ३० रुपयांत जेवण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत. शिवभोजन योजनेत जेवण देतांना स्वच्छता, टापटीप आणि जेवणाचा दर्जा उत्तम राहावा, याबद्दल उद्धव ठाकरे दक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी योजना सुरु झाल्यानंतर शिवभोजन केंद्रात जेवण घेत असलेल्या नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधला होता. जेवणाबाबत समाधानी आहात का, जेवणाची चव व्यवस्थित आहे का, काही सुचना असल्यास मनमोकळेपणाने सांगण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले होते.
१० रुपयांच्या शिवथाळीसोबत १५ रुपयांची पाण्याची बाटली, आव्हाड ट्रोल
जिल्हा रुग्णालये, बस तसेच रेल्वे स्थानक परिसर, शासकीय कार्यालये अशा ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या थाळीची किंमत शहरी भागात ५० आणि ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे. परंतू लाभार्थ्याला फक्त १० रुपये देऊन या जेवणाचा आस्वाद घेता येतो. सध्याच्या घडीला राज्यभरात १३९ शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत.