मुंबई : Shiv Sena's warning to Navneet Rana and Ravi Rana :राणा दाम्पत्याच्या मुंबईतल्या खार निवासस्थानी शिवसैनिकांचा खडा पहारा दिला आहे. हिंमत असेल तर राणा दाम्पत्यानं बाहेर पडून दाखवावंच , असे खुलं आव्हान शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला दिले आहे. भाजपच्या सांगण्यावरुन स्टंट करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेने केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जोरदार फिल्डिंग लावली. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुंबईतील खारच्या घराबाहेर शिवसैनिकांनी रात्रभर खडा पहारा दिला. राणा दाम्पत्याला घराबाहेर पडू न देण्याची व्यूहरचना शिवसैनिकांनी आखली. त्यामुळे काल संध्याकाळपासूनच शिवसैनिक तिथं जमले आणि त्यांनी भजन-कीर्तन सुरू केलं. इमारतीबाहेर बॅरिकेटिंग करण्यात आलं. त्याच्या बाहेरच्या बाजूला शिवसैनिक जमलेत.
राणा दाम्पत्य मातोश्रीवर आज धडक देणार असल्यामुळे शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर रात्रभर पहारा देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी वर्षावर जाण्यापूर्वी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिला शिवसैनिकांना घरी जाण्याचं आवाहन केलं. मात्र शिवसैनिकांनी घरी जाण्यास नकार दिला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे समोर आल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राणांच्या इशारामुळे उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक घेऊन शिवसेना नेत्यांशी चर्चा केली.
मुंबईतील खारमध्ये रहाणाऱ्या एका कट्टर शिवसैनिकाने स्वत:च्या छातीवर आणि पाठीवर बाळासाहेब ठाकरे यांचा टॅटू काढला आहे. मातोश्री आमची आई आहे, त्यांच्याबद्दल कोणी बोललं तर त्यांना महाप्रसाद देऊ अशी भावना शिवसैनिक गणेश गावडे यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांना आव्हान देणारं नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचवण्यावर ठाम आहे. आज सकाळी 9 वाजता राणा दाम्पत्य मातोश्रीवर धडकणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी कालच राणांना नोटीस बजावली आहे. तरीदेखील मातोश्रीवर जाण्याचा निर्धार पत्रकार परिषदेत बोलून दाखवला. तर हनुमान चालिसा म्हटल्यावर प्रसाद देण्याची परंपरा आहे, शिवसैनिक त्यांना प्रसाद देतील, असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिला आहे.