मुंबई: शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्यावर आता पक्षाने लोकसभेसाठी कोकणची जबाबदारी दिलीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क नेतेपदी शिवसेना नेत्यांची घोषणा केलीय. त्यात शिंदे आणि देसाईंवर कोकणची जबाबदारी देण्यात आलीय. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघ तर सुभाष देसाई यांच्याकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे लोकसभा मतदार संघाच्या संपर्क नेतेपदाची जबाबदारी देण्यात आलीय.
शिवसेना सध्या भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी आहे. मात्र, दोन्ही पक्षात पहिल्या दिवसापासून सत्तासंघर्ष सुरू आहे. त्यात दोन्ही पक्षांची २०१४च्या निवडणुकीत युती तुटली. त्यामुळे दुखावलेल्या शिवसेना नेतृत्वाने यापुढे स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेना असा निर्णय घेईल अशी भाजपला अपेक्षा नव्हती. मात्र, शिवसेनेने हा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपच्या गोटातून आता २०१९मध्ये शिवसेनेला सोबत घेऊनच निवडणुका लढवाव्यात असे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे अनेक नेते शिवसेनेला युतीबाबत चुचकारत असतात तशी विधानेही करतात पण, शिवसेना त्याकडे लक्ष देत नाही.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे राज्यभरातील दौरे. पक्षबांधणीसाठी सुरू केलेले प्रयत्न. पक्षांतर्गत बदल, दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या या सर्व गोष्टी पाहता शिवसेना भविष्यात आपला निर्णय आमलात आणत स्वबळावरच लढणार असे दिसते.