दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होणार आहे.
नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध करत स्वतः उद्धव ठाकरे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र दुसरीकडे हा प्रकल्प अद्याप रद्द झाला नसल्याचे उद्योगमंत्र्यांच्या लेखी उत्तरावरून स्पष्ट होतंय. तर दुसरीकडे या प्रकल्पासाठी आंदोलनंच झालं नसल्याचं खोटं उत्तर उद्योगमंत्र्यांनी विधानसभेत दिल्यानं आता शिवसेनेवर टीका होऊ लागलीय.
कोकणातील वादग्रस्त रिफायनरी प्रकल्पाबाबत विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिलेले हे लेखी उत्तर... या लेखी उत्तरावर नजर टाकली तर नाणार प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेली उत्तरं धक्कादायक आहेत. कोकणातील आमदार नितेश राणे, भास्कर जाधव यांच्यासह अनेक आमदारांनी नाणारबाबत प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांना शिवसेनेचेच असलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेल्या उत्तरावर एक नजर टाकूया..
१) जगातील पहिला ग्रीन रिफायनरी प्रकल्प
उभारण्याच्या दृष्टीने शासनाने नोटीस काढून नाणारसह हे खरे आहे
१४ गावातील १४ हजार ९०० एकर जमीनीवर औद्योगिक
क्षेत्र घोषित केले आहे का ?
२) नाणार प्रकल्प रद्द करावा म्हणून
२८ डिसेंबर २०१७ रोजी सर्वपक्षीय हे खरे नाही
संघर्ष समितीने बंद पाळून आंदोलन केलं होतं का ?
३) प्रकल्प रद्द करण्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये हे खरे नाही
देवगड तहसिलदार यांच्याकडे निवेदन आले आहे का ?
नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी आंदोलनंच झालं नाही अथवा निवेदनचं आलं नाही असं खोटं उत्तर दिल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेनंही नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द व्हावा यासाठी आंदोलन केलं होतं आणि त्याच पक्षाचे असलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई लेखी उत्तरात त्याच्या विपरित उत्तर देतात त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढणार आहेत. यावर आता काय भूमिका घ्यायची याबाबत शिवसेनेची आता अडचण झाली आहे.