फडणवीस 'काळजीवाहू' मुख्यमंत्री, शिवसेनेने डिवचलं

शिवसेनेचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

Updated: Nov 6, 2019, 05:54 PM IST
फडणवीस 'काळजीवाहू' मुख्यमंत्री, शिवसेनेने डिवचलं title=

मुंबई : पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी बुधवारी धरली. त्यासाठी केंद्राकडून किमान १७ हजार कोटींची मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्याशिवाय कर्जवसुलीच्या नोटिसा थांबवाव्यात आणि वीज बिल वसुलीसाठी तगादा लावू नये, अशा मागण्याही शिवसेनेच्या मंत्र्यांनी केल्या आहेत.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री हजर होते. उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार बैठकीला हजर राहिल्याचं शिवसेनेच्या मंत्र्यांनी सांगितलं. तसंच बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेनेच्या मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं. 

देवेंद्र फडणवीस यांचा काळजीवाहू मुख्यमंत्री असा खोचक उल्लेख रामदास कदम आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. तर आजच्या बैठकीचा केंद्रबिंदू अन्नदाता शेतकरी होता. अवकाळी पावसामुळे सुमारे ७० लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.