Sanjay Raut ED : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. आता ईडी कोठडीतूनच संजय राऊत यांनी मित्र पक्षांना पत्र लिहिलं आहे.
संजय राऊत यांच्यावर ईडी कारवाई झाल्यानंतर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी निषेध व्यक्त केला होता. यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी संजय राऊत यांनी पत्र लिहिलं असून आता रडायचं नाही तर लढायचं अशा शब्दात राऊतांनी बाळासाहेबांच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांना संजय राऊत यांनी हे पत्र लिहिलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला रडायचं नाही लढायचं अशी शिकवण दिली होती, त्याच मार्गाने आम्ही जात असल्याचं राऊत यांनी या पत्रात म्हटलं आहे. अडचणीच्या काळात तुमच्यासोबत कोण आहे हे कळतं, माझ्यावर झालेल्या कारवाईविरोधात मला कृती आणि विचारातून पाठिंबा दिला. संसदेत आणि संसदेबाहेर उपस्थित केलेल्या मुद्द्यावर आपण सर्वांनी पाठिंबा दिला, त्यासाठी आभार मानत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावापुढे आपण झुकणार नाही, अंतिम श्वासापर्यंत लढत राहिन, दबावापुढे शरण जाणार नाही, विजय आमचाच होणार आहे आणि देश योग्य दिशेने पुढे जाईल असंही राऊत यांनी पत्रात लिहिलं आहे.
काय आहे पत्राचाळ प्रकरण
मुंबईतील गोरेगावमध्ये ही पत्राचाळ आहे. या पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊत यांच्या मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली.
राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचं पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं. मात्र गुरु आशिष कन्सट्रक्शन कंपनीने भाडेकरुंसाठी आणि म्हाडासाठी सदनिका न बांधताच एकूण 9 विकसकांना तब्बल 901 कोटींना एफएसआय विकला.
गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रकल्प सुरु करण्यात आला. तसेच सदनिका विकण्याच्या नावाखाली 138 कोटींची माया जमा करण्यात आली.
मात्र यानंतर म्हाडाच्या अभियंत्याने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर ईडीची एन्ट्री झाली. ईडीने या प्रकरणात चौकशी सुरु झाली. ईडीला तब्बल 1039.79 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यापैकी प्रवीण राऊत यांच्या खात्यात 100 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
प्रवीण यांनी ही रक्कम आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे ट्रान्सफर केली. या 100 कोटींपैकी 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी दिल्याचं समोर आलं.