राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्वोच्च न्यायालयात धाव

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी विकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निर्णय रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी  मागणी आहे. 

Updated: Nov 23, 2019, 07:53 PM IST
राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्वोच्च न्यायालयात धाव title=

मुंबई : शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी विकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निर्णय रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी  मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशीही मागणी केली आहे. 

राजभवनावर झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीविरोधात ही याचिका दाखल केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सकाळी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. त्यावेळीच कायदेशीर मार्गाने लढाई लढणार असल्याचे तिन्ही पक्षांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आता न्यायालयात पोहोचला आहे. दरम्यान यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुरु असलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे ५० आमदार उपस्थित असल्याची माहिती आहे. अजित पवारांनी आज सकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन शरद पवारांना धक्का दिला. आता राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवारांसोबत दिसत असले तरी ३० नोव्हेंबरला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्यावेळी आमदार कोणाच्या बाजूने उभे राहतात याकडे लक्ष आहेत.