मुंबई : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembaly Winter session) दुसऱ्या दिवशी विवध मुद्दयांवरुन वातावरण तापलं असतानाच विधानभवन परिसरात घडलेल्या एका गोष्टीची दिवसभर चर्चा होती. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज विधानभवनात प्रवेश करत असताना विधीभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोल करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांना डिवचलं. नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना पाहून म्याऊ... म्याऊच्या घोषणा दिल्या.
सुनील प्रभू यांचं जशास तसं उत्तर
नितेश राणे यांच्या कृत्यावर शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. भाजपवाल्यांची यातून संस्कृती दिसून येते असं सुनील प्रभू यांनी म्हटलं आहे.
विधीमंडळाची ही वास्तू ही पवित्र वास्तू आहे, त्याच्यात आपण कायदा घडवण्याचं काम करतो, थोर परंपरा असलेले दिग्गज माणसं या विधानसभेत होऊन गेले. त्यामुळे या वास्तूकडे बघण्याचा दृष्टीकोण वेगळा आहे.
पण ज्या पद्धतीने आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आवाज काढण्याच जे काम झालं, मला असं वाटतं की वाघाला बघून मांजर म्याव म्यावच करणार. आणि ज्याने हा आवाज काढला त्याने कॉ...कॉ..कॉ केलं केलं असतं तरीही मला आश्चर्य वाटलं नसतं असा टोला लगावत सुनील प्रभू यांनी वाघ हा वाघच असतो, वाघाला बघून मांजर ओरडते, म्हणून त्यांनी म्याव म्याव केलं, असं म्हटलं आहे
वाघ बाजूनं जाताना मांजर म्याव म्यावच करणार असं देखील प्रभू म्हणाले.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर काय घडलं
अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विधान भवनाच्या पायरीवर बसून भाजप आमदारांनी घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन, परीक्षा घोटाळा अशा इतर मुद्द्यांवर विरोधक घोषणा देतहोते. त्याचवेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री सुनील केदार हे विधानभवनात प्रवेश करत होते. यावेळी नितेश राणे यांनी म्याऊ... म्याऊ... असे आवाज काढले. नितेश राणे यांच्या या कृतीवर भाजपचे इतर नेतेही हसत होते.