'मोदींनी सहा वर्षात चांगले निर्णय घेतले तशा चुकाही केल्यात'

भारताला केवळ सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे का? त्यापूर्वी हा देशच नव्हता का? 

Updated: Jun 1, 2020, 08:03 AM IST
'मोदींनी सहा वर्षात चांगले निर्णय घेतले तशा चुकाही केल्यात' title=

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा वर्षात अनेक चांगले निर्णय घेतले. आजघडीला देशभरात त्यांच्यासारखा दुसरा सक्षम नेता नाही. मात्र, त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा सूर शिवसेनेच मुखपत्र असलेल्या 'सामना'तून आळवण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या टर्मला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने भाजप नेत्यांनी विविध प्रसारमाध्यमांना मुलाखती देत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाचे गोडवे गायले होते. पंतप्रधान मोदींनी गेल्या सहा दशकांतील ऐतिहासिक चुका दुरुस्त करण्याचे मोठे काम केले, असे अमित शहा यांनी सांगितले होते. मात्र, शिवसेनेने भाजप नेत्यांचा हा दावा खोडून काढला आहे.

'कोरोना संकटात मोदी पंतप्रधान असणं भाग्यच'

भारताला केवळ सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे का? त्यापूर्वी हा देशच नव्हता का? सहा दशकांत काहीच घडले नाही का?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला. तसेच सहा वर्षांच्या काळात मोदींनी चांगले निर्णय घेतले तशाच अनेक चुकाही केल्या. आजघडीला देशात नरेंद्र मोदी यांच्यासमोर टिकू शकेल असा नेता नाही. मोदींना राष्ट्रकार्याची तळमळही आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉकडाऊन व स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणतील निर्वासितांची आठवण करुन देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार? मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉकडाऊन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?, असा सवाल 'सामना'तून उपस्थित करण्यात आला आहे.

मोदींच्या दूरदर्शी धोरणांनी देशाच्या लोकशाहीला नवीन दिशा दिली - जेपी नड्डा

'सामना'च्या अग्रलेखातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:

* कोरोनाचे संकट जागतिक आहे. बड्या राष्ट्रांच्या आरोग्यसेवा कोलमडल्या असताना हिंदुस्थानात लॉकडाऊनच्या काळात दररोज कोरोना टेस्ट क्षमता १० हजारावरुन १.६० लाखांवर गेली आहे. आज देशात दररोज ४.५० पीपीई किट तयार होतात. ५८ हजार व्हेंटिलेटर्स बनत आहेत. हे आत्मनिर्भरतेचे लक्षण नाही काय, असा प्रश्न भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा विचारतात. अर्थात याआधी देशातून पोलिओसारखे आजार हद्दपार केले गेले. टीबी, मलेरिया नियंत्रणात आणला हे कोणत्या सरकारने केले? कोरोना आज आला, त्याआधी प्लेगसारखी महामारी येऊन गेली. देशात तेव्हा व्हेंटिलेटर्स होते व चीनकडून मागवले जात नव्हते. गेल्या साठ वर्षात एम्ससारख्या वैद्यकीय संस्था, लाखो डॉक्टर्स, सरकारी इस्पितळे, आयसीएमआरसारख्या संस्था निर्माण झाल्या.

* १९७१ साली इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करुन फाळणीचा सूड घेतला. ही ऐतिहासिक चूक मानायची की ऐतिहासिक कार्य? राजीव गांधी यांनी डिजिटल क्रांतीची सुरुवात केली. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी कोसळलेल्या अर्थव्यवस्थेस गती दिली. म्हणून आजचा हिंदुस्थान उभा आहे.